"ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर सरकारकडून आकसाने कारवाई"
By नारायण जाधव | Published: November 10, 2022 08:07 PM2022-11-10T20:07:45+5:302022-11-10T20:08:22+5:30
भास्कर जाधव यांचा घणाघाती आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आकसाने कारवाई करण्याचे काम विद्यमान सरकारकडून सुरू आहे. सत्ताधारी पक्षातल्या लोकांवर कारवाई केली जात नाही. आमचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींविरोधात जिथे कारवाई होते. त्याला विरोध म्हणून लोकशाही मार्गाने मोर्चा काढला. तर आमच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल केले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हेच सुरू आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नवी मुंबईत केला.
माझ्यावर नवी मुंबईत दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यासाठी मी इथे आलो होतो”, असे जाधव यावेळी म्हणाले. भाजपाच्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य अश्लाघ्य आणि निषेधार्ह आहेत. त्यात आता त्याच्याच बाजूला शिंदेंचा गट जाऊन बसला आहे.
पाटील, सत्तार यांना सुसंस्कृत धाक नाही
गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. तो आता राहिलेला नाही. भाजपा कधीकधी आपले विचार दुसऱ्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत असते. गुण नाही, पण वाण लागला, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटासोबतच भाजपालाही लक्ष्य केले.
पीएमएलए कोर्टाेचे ताशेरे केंद्रावर
संजय राऊतांना जामीन मंजूर करताना “पीएमएलए कोर्टाने ओढलेले ताशेरे फक्त ईडीवर नसून केंद्राच्या कारभारावर, कृतीवर, प्रवृत्तीवरही आहेत. कोर्टाने अनेक आक्षेप नोंदवले आहेत. आम्हाला अनेक प्रकारचा मानसिक त्रास झालाय. पण यातून तरी ईडी आणि केंद्र सरकारचे डोळे उघडतील, असे त्यांनी नमूद केले.