कळंबोली - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा दोन दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे येथे काळेख पसरला असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते विकास महामंडळ व आयआरबीने याकडे वेळीच लक्ष देऊन बोगद्यातील दिवे चालू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधलेल्या या बोगद्याचे अंतर एक हजार ४६ मीटर आहे. आतमध्ये मोठे दिवे बसविण्यात आले आहेत. ते रात्रंदिवस सुरू असतात; परंतु गेल्या दोन दिवसापासून आतमधील दिवे बंद आहेत. त्यामुळे बोगद्यातील काळोखातून वाहने ये-जा करतात. अंधार असल्याने पुढची वाहने दिसत नाहीत. अचानक ब्रेक लावल्यास मागून आलेली वाहने धडकण्याची शक्यता असते.अंधारात वेग कमी जास्त करण्याससुद्धा वाहनचालकांना अडचणी येत आहेत. सध्या पावसाळी दिवस असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. भाताण तसेच अमृतांजन पुलाजवळ दरडी कोसण्याची भीती असते. दरडी कोसळल्याने कित्येकदा एकच लेन चालू असते. बोगद्यात अंधार असल्यानेही अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे. रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गाची योग्य देखभाल होत नसून सुविधा पुरवण्यातही दिरंगाई केली जात असल्याचे प्रशांत रणवरे या वाहनचालकाने ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया नोंदवली.टोल घेऊनही गैरसोयमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो. यातून दररोज लाखो रुपयांची कमाई होते असे असताना सुविधा, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष का केले जाते असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारी यांनी उपस्थित केला आहे. दोन दिवस बंद असतील तर संबंधित कंपनीवर वाहनचालकांचा जीव धोक्यात घातला म्हणून कारवाई करा, अशी मागणी या आपण मुख्यमंत्री कार्यालयाकडे करणार असल्याचे भंडारी म्हणाले.भाताण बोगद्यातील दिवे बंद असेल तर पाहणी करून लवकरात लवकर दिवे सुरू करण्यात येईल. याबाबत वाहनचालकांना त्रास होणार नाही याची दखल घेतली जाईल.- नम्रता रेड्डी, कार्यकारीअभियंता, एमएसआरडीसी
द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:41 AM