Video : भाऊ कदम यांनी मागितली आगरी समाजाची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 10:08 PM2018-11-10T22:08:48+5:302018-11-10T22:50:09+5:30
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिनेते भाऊ कदम यांची भेट घेतली.
- वैभव गायकर
पनवेल : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिनेते भाऊ कदम यांची भेट घेतली. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. याबाबत भाऊ कदम यांनी आगरी समाजाची माफी मागितली आहे. आगरी समाजाच्या शिष्टमंडळाने भाऊ कदम यांची भेट घेतली, तेव्हा भाऊ कदम यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला.
ला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या ५ आणि ६ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटमध्ये विविध गायक, कवी अशी पात्रं प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ अधोक्षज भोईरचे एक विनोदी पात्र दाखवण्यात आले होते. हे नाव आगारी समाजात अत्यंत अभावाने आढळत असल्याचे अॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी पत्र लिहून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, आगरी पात्राद्वारे तुम्ही विनोदाची निर्मिती केल्यास आम्हाला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही कार्यक्रमाद्वारे आगरी समाजावर टीका करण्यास कोणालाही अधिकार नाही. आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावले आहे की, आमच्या समाजाचा अपमान केल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या टीमने माफी मागावी.
आगरी-कोळी भूमिपुत्र संघटनेने कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सात दिवसांत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा इशारा या संघटनेने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना दिला आहे. आता हे पत्र मिळाल्यानंतर कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून आणि झी वाहिनीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.