भावे नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपासून होणार सुरू, नाट्यरसिकांची गैरसोय टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 12:03 AM2019-12-07T00:03:58+5:302019-12-07T00:04:10+5:30
शहरातील नाट्यरसिकांसाठी सिडकोने १९९६ मध्ये वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची निर्मिती केली आहे.
नवी मुंबई : शहरातील एकमेव विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, १ जानेवारी २०२० रोजी महापालिकेच्या वर्धापन दिनी प्रेक्षकांसाठी ते खुले होणार आहे. नूतनीकरणात अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नाट्यरसिकांची आणि कलाकारांची होणारी गैरसोय टळणार आहे.
शहरातील नाट्यरसिकांसाठी सिडकोने १९९६ मध्ये वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची निर्मिती केली आहे. कालांतराने हे नाट्यगृह नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. नाट्यगृहात आवश्यक कामे करण्यात आली असली तरी नूतनीकरण न झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नाट्य कलाकार आणि रसिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. त्याअनुषंगाने महापालिकेने नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
सुमारे १००१ बैठक व्यवस्था असलेल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सुमारे १३ कोटी रु पये खर्च करण्यात आला आहे. यामध्ये अंतर्गत स्थापत्य कामे, आधुनिक वातानुकूलित यंत्रणा बसविणे, ध्वनी व प्रकाश योजना नियंत्रण यंत्रणा बसविणे, प्लास्टर करणे, कार्पेट बसविणे, फॉल सिलिंग करणे, नवीन खुर्च्या बसविणे, कलाकारांचा विश्रांती कक्ष व खोल्या तसेच कार्यालयाचे नूतनीकरण करणे, लॉबीचे नूतनीकरण करणे, अग्निशमन यंत्रणा बसविणे, पार्किंग व्यवस्थेचे नियोजन, संरक्षक भिंतीची सुधारणा, दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेशासाठी बॅरिअर फ्री प्रवेश व्यवस्था, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, अद्ययावत विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृह, टाइल्स, वॉटर प्रूफ आदी कामे करण्यात आली आहेत. नाट्यगृहात येणाऱ्या अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्यगृहामधील प्रेक्षकगृहातील किरकोळ कामे वगळता सर्वच कामे पूर्ण झाली असून, बाह्य कामे सुरू आहेत. शहरातील नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद असल्याने नाट्यरसिकांना मुंबई, ठाणे अथवा मुलुंड येथील नाट्यगृहात जावे लागत होते, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. नूतनीकरणाच्या माध्यमातून भावे नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होत असून, नाट्यरसिकांना ही नवी पर्वणी ठरणार आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहातील प्रेक्षकगृहात सुरू असलेली सर्वच कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. प्रेक्षकगृहाच्या बाहेरील भागातील कामे सुरू असून, त्याचा कोणताही परिणाम नाट्यगृहातील कार्यक्र मांवर होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या वर्धापन दिनापासून नाट्यगृहातील प्रेक्षकगृहाचा वापर करता येणार आहे.
- सुरेंद्र पाटील,
शहर अभियंता