भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही, ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:59 AM2018-01-03T06:59:24+5:302018-01-03T06:59:50+5:30

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

 In Bhima Koregaon case, even in Navi Mumbai, there were demonstrations in the area | भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही, ठिकठिकाणी निदर्शने

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही, ठिकठिकाणी निदर्शने

Next

नवी मुंबई : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनता असुरक्षित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
तुर्भे येथील संतप्त जमावाने ठाणे-बेलापूर मार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी आंदोलनाची भूमिका ठरवण्यासाठी ऐरोली येथे विविध राजकीय संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर ऐरोलीत आरपीआयच्या वतीने मोर्चा काढून नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली. दरम्यान, एक ते दोन दुकानांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. तर रबाळे येथे काहींनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको केला. चिंचपाडा येथे रस्त्यावर उतरलेल्या जमावाने ठाणे-बेलापूर मार्ग अडवून धरला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तुर्भे नाका येथील पुलाखाली जमलेल्या महिला व पुरुषांच्या जमावाने त्या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

कामोठेत दुकाने बंद
कामोठेत मंगळवारी सायंकाळी जमावाकडून घोषणाबाजी करीत दुकाने बंद ठेवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी जमलेल्या जमावास समज देऊन वातावरण शांत केले. जमावाने क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. टी.व्ही.सेंटर, येथे सुमारे हजारो लोकांचा जमाव रस्त्यावर आला. त्यांनी परिसरातील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या पालथ्या केल्या. यामुळे लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये तणाव निर्माण झाला. जयभवानीनगर येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दगडफेक करून प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, येथील दुकानाच्या काचा फोडण्यात आल्या.

शहरात चोख पोलीस बंदोबस्त
भीमा कोरेगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद पनवेलमधील काही भागात उमटल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले. विविध संघटनांनी निषेध नोंदविण्यासाठी पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कळंबोली या ठिकाणी निदर्शन केली. या वेळी कायदा सुरक्षा राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पनवेल बंदची हाक
रायगड रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनी बुधवारी पनवेल बंदची हाक दिली. नागरिकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवावा, असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

आंदोलनादरम्यान कायदा हातात घेतल्याने एनआरआय, रबाळे व रबाळे एमआयडीसी येथे चार गुन्हे दाखल आहेत. बुधवारीही शहरात चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखावी. कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल.
- डॉ. सुधाकर पठारे,
पोलीस उपआयुक्त
 

Web Title:  In Bhima Koregaon case, even in Navi Mumbai, there were demonstrations in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या