बदलापूरला मिळणार भोज धरणातील पाणी
By admin | Published: November 14, 2015 02:11 AM2015-11-14T02:11:45+5:302015-11-14T02:11:45+5:30
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे
बदलापूर : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी या पाणीकपातीचा सर्वात कमी त्रास हा बदलापूरकरांना होणार आहे. ऐन पाणीसंकटाच्या वेळी बदलापूरकरांना कोंडेश्वर येथील भोज धरणातून पाणी मिळणार आहे. त्यामुळे ही पाणीकपात कमी होण्याचे आणि वेळेवर रद्द होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
बदलापूर हे शहर सर्वात जलद गतीने वाढणारे शहर म्हणून नावारूपाला आले. शहर वाढत असले तरी पाण्याचे स्रोत मात्र तेवढेच असल्याने बदलापूरकरांना आधीच पाणीसंकटाला सामोरे जावे लागत होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार आणि तत्कालीन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी बदलापूर शहराच्या हद्दीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या भोज धरणातील पाणी बदलापूरला मिळावे, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने २०१३ मध्ये आदेश काढून शहराला या धरणातील पाणी देण्याचे मान्य केले होते. मात्र, दोन वर्षांत यासंदर्भातील करारनामा न केल्याने ते पाणी बदलापूरकरांना मिळालेच नाही.
मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी कथोरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संबंधित विभागाशी लागलीच करारनामा करून या धरणातील पाणी सोडण्यास अंतिम मंजुरी मिळविली आहे. यामुळे समस्या सुटण्याचे संकेत मिळत आहेत.