भूसुरुंगामुळे उलवे परिसर हादरला; विमानतळाच्या कामाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:15 AM2018-10-09T06:15:06+5:302018-10-09T06:15:17+5:30

विमानतळ परिसरातील टेकडी सपाटीकरणासाठी लावलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील घरांवर दगडांचा वर्षाव झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

 Bhujurunga shakes the area of ​​Ulave; Result of the work of the airport | भूसुरुंगामुळे उलवे परिसर हादरला; विमानतळाच्या कामाचा परिणाम

भूसुरुंगामुळे उलवे परिसर हादरला; विमानतळाच्या कामाचा परिणाम

Next

पनवेल : विमानतळ परिसरातील टेकडी सपाटीकरणासाठी लावलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील घरांवर दगडांचा वर्षाव झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन याविषयी जाब विचारला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसाठी उलवे येथील टेकडीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. ९० मीटर उंची असलेली टेकडीची उंची कमी करून ९ मीटर करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १३०० स्फोट घडविले जाणार आहेत. रोज दुपारी पावणेदोन ते दोन वाजण्याच्या सुमारास ब्लास्टिंग केले जाते. ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांवर दगड पडणे व नुकसान होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. सोमवारी दुपारी सपाटीकरणासाठी केलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील जवळपास १५ घरांवर दगड पडले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
दगड पडले तेव्हा शाळा सुरू होती, परंतु सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेमुळे संतापलेल्या शेकडो नागरिकांनी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी जावून नागरिकांना शांत केले. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेचे वृत्त समजल्यानंतर पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. शाळेवर व घरावर पडलेल्या दगडांविषयी पंचनामा केला आहे. याविषयी अहवाल सिडकोला देण्यात येणार आहे.
या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करण्याचे काम सुरू होते. विमानतळ परिसरामध्ये यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर दगडांमुळे मोठी जीवित व वित्त हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी स्थिती राहिली तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

घराला पडले
होते भगदाड
यापूर्वी वरचे ओवळे गावातील विलास घरत यांच्या घरावर ब्लास्टिंगचा दगड पडल्याने छताला व भिंतीला भगदाड पडले होते. यानंतर जूनमध्येही ओवळे गावातील गोमूबाई लांगी यांच्या घरावर दगड पडल्याने घराचे छप्पर कोसळले होते. या दोन्ही घटनांच्या नंतर प्रशासनाने घरांवर पडलेले दगड ब्लास्टिंगचे नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुन्हा घरांवर दगड कोसळण्याच्या घटना घडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

माहिती घेण्यात येणार
उलवे येथील घटनेविषयी सिडको प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या घटनेविषयी माहिती घेण्यात येणार आहे. सविस्तर माहिती घेतल्यानंतर माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदारावर गुन्हा दाखल
निष्काळजीपणा करणाºया ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याप्रकरणी वरचे ओवळे येथील दीपक घरत यांनी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी जीव्हीके कंपनीने नेमलेल्या उपठेकेदाराच्या विरोधात प्रमाणापेक्षा ब्लास्टिंग करून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

उलवे टेकडी सपाटीकरण करणाºया ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गावातील घरांचे व शाळेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व नुकसान झालेल्या ग्रामस्थांना भरपाई देण्यात यावी.
- पुंडलिक म्हात्रे,
ग्रामस्थ, उलवे

या घटनेचे वृत्त समजल्यानंतर आम्ही घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. छपरावर दगड पडल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी पंचनामा करण्यात आला असून याविषयी अहवाल सिडको प्रशासनाला देण्यात येणार आहे.
- दीपक आकडे,
तहसीलदार, पनवेल

Web Title:  Bhujurunga shakes the area of ​​Ulave; Result of the work of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.