टेमघरमध्ये पुन्हा दिसला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:25 PM2019-11-01T23:25:20+5:302019-11-01T23:25:43+5:30
नोव्हेंबर २०१८ मध्ये तळोजातील कोलटेन कंपनीच्या आवारात बिबट्या दिसला होता. ७ आॅक्टोबर रोजी ओवळे गावातील धर्मा म्हात्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे
पनवेल : पनवेल व उरण परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. तालुक्यातील टेमघर गावाजवळ एका तरुणाला गुरुवारी बिबट्या दिसला. याची माहिती दिल्यानंतर वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात येत असून काही ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
नोव्हेंबर २०१८ मध्ये तळोजातील कोलटेन कंपनीच्या आवारात बिबट्या दिसला होता. ७ आॅक्टोबर रोजी ओवळे गावातील धर्मा म्हात्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, वनविभागाने बिबट्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही.
तर ३१ आॅक्टोबर रोजी नेरे जवळील टेमघर परिसरात रूपेश गायकर या तरुणाला रस्त्यावर बिबट्या दिसला, त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. तर दुसऱ्या एका व्यक्तीला बिबट्यासोबतच दोन बछडेही परिसरात फिरताना दिसले त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक घाबरत आहेत.
वनविभागाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना प्राण्याचे ठसे सापडून आले आहेत. मात्र, ते ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत, याचा शोध सुरू आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळेस एकटे फिरू नये, तसेच सोबत बॅटरी, काठी ठेवावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.