विदेशी बनावटीप्रमाणे दिसणारी दुचाकी जप्त
By admin | Published: January 23, 2016 03:15 AM2016-01-23T03:15:52+5:302016-01-23T03:15:52+5:30
बुलेट मोटारसायकलचे विदेशी बनावटीच्या बॅटमन बाईकमध्ये रूपांतर केलेली मोटारसायकल नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहे
नवी मुंबई : बुलेट मोटारसायकलचे विदेशी बनावटीच्या बॅटमन बाईकमध्ये रूपांतर केलेली मोटारसायकल नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केली आहे. विनापरवाना वाहनांच्या रचनेमध्ये बदल केला असल्याने ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने डिसेंबरमध्ये स्कॉर्पिओमध्ये लिमो या अत्याधुनिक कारप्रमाणे बदल केल्याचे उघडकीस आणले होते. दोन कार जप्त केल्या होत्या. यानंतर शुक्रवारी पुन्हा विनापरवाना बुलेटचे बॅटमनमध्ये रूपांतर केलेली मोटारसायकल जप्त केली आहे. आरटीओ निरीक्षक आनंदराम वागळे हे विक्रोळीमधून जात असताना त्यांना एमएच ०१ क्यूए ४२४४ ही मोटारसायकल दिसली. आधुनिक मोटारसायकल या परिसरात कशी, असा प्रश्न त्यांना पडला. याविषयी माहीती घेतल्यानंतर बुलेटचे रूपांतर आधुनिक मोटारसायकलमध्ये केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी विक्रोळी परिसरातून ही गाडी जप्त केली आहे.
मोटारसायकलमधील मूळ चाकांच्या मांडणीमध्ये बदल करून तेथे जाड टायर बसविले आहेत. पुर्ण चेसीसमध्ये बदल केला आहे. यामुळे सदर मोटारसायकलवर कारवाई केली आहे. मोटारसायकलचा मालक राजेश भिंगार्डे याच्याकडे चौकशी केली असता मी बदल केला नाही. मूळ मालकानेच बदल केला असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी वाहनांमध्ये विनापरवाना बदल करणारी टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू केला आहे.