रिक्षाचालकाकडून बसचालकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:22 AM2019-06-09T02:22:36+5:302019-06-09T02:23:02+5:30
कोपरखैरणेतील प्रकार । मार्गात अडथळा केल्याच्या वादातून केली मारहाण
नवी मुंबई : रिक्षाचालकाकडून एनएमएमटीचालकावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार कोपरखैरणेत घडला आहे. रहदारीच्या मार्गावर बेशिस्तपणे रिक्षा चालवत बसच्या मार्गात अडथळा केल्याचा जाब बसचालकाने विचारल्याने हा प्रकार घडला. यामध्ये बसचालक जखमी झाला असून, महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे.
एनएमएमटीचालक विकास गवाले यांच्यावर रिक्षाचालकाने जीवघेणा हल्ला केला आहे. ते मार्ग क्रमांक ९ वरील बस (एमएच ४३ एच ५४६४)वर चालक आहेत. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते बस घेऊन वाशी रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात होते. या वेळी कोपरखैरणे सेक्टर २ येथे एक वेगवान रिक्षा (एमएच ४३ बीएफ ०७३८) मार्गात आडवी येऊन अचानक थांबली. यामुळे गवाले यांनी संभाव्य अपघात टाळण्यासाठी बसचा ब्रेक दाबला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी पुढच्या सिटवर आदळल्याने काहींना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे बसचालक विकास गवाले यांनी रिक्षाचालकाला अचानक ब्रेक दाबल्याप्रकरणी जाब विचारला. यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला असता, गवाले यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत बस पुढे नेली. मात्र, रिक्षाचालकाने त्यांच्या बसचा पाठलाग करत सेक्टर १५ येथील थांब्यावर बस थांबली असता, बसमध्ये घुसून गवाले यांच्यावर हल्ला केला. रिक्षाचालकाने सोबत आणलेल्या विटेने बसचालकाला मारहाण केली.
महिन्याभरापूर्वीच कोपरखैरणे बस डेपोच्या प्रवेशद्वारावरच एनएमएमटीच्या चालकाला रिक्षाचालकाने मारहाण केली होती. याच कालावधीत मद्यधुंद रिक्षाचालकाने कारचालकाला मारण्याच्या उद्देशाने कोपरखैरणे ते वाशीपर्यंत सोबत दगड घेऊन पाठलाग केला होता. अशा प्रकारांवरून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांची प्रतिमा मलीन होत चालली आहे.