बिद्रे हत्या प्रकरण : मृतदेहाच्या शोधासाठी ग्रॅडिओमीटर, प्रतिदिन दोन लाखांचा खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:56 AM2018-03-21T01:56:55+5:302018-03-21T01:56:55+5:30
महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी, ग्रॅडिओमीटर उपकरणाची मदत पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रतिदिन दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी, ग्रॅडिओमीटर उपकरणाची मदत पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रतिदिन दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे काही दिवसांपूर्वी तपासात समोर आले आहे. चौकशीत महेश पळशीकर याने हत्येची कबुली देत, बिद्रे यांचा मृतदेह तुकडे करून वसई खाडीत टाकल्याचे सांगितल्यावर, पोलिसांनी वसई खाडीत शोधमोहीम राबवली, परंतु दोन दिवस शोध घेऊनही हाती काहीच लागले नाही. अखेर मॅग्नोमीटर अथवा ग्रॅडिओमीटर उपकरणाच्या मदतीने खाडीमध्ये शोध घेण्याचा विचार पोलीस करत आहेत. ग्रॅडिओमीटर हे अधिक अद्ययावत असल्याने, खासगी कंपन्यांकडून खर्चाचे अंदाजपत्रक मागविले आहे. त्यापैकी नेरुळच्या फग्रो कंपनीने अंदाजपत्रक पोलिसांकडे सादर केल्याचे समजते. त्यानुसार, ग्रॅडिओमीटर उपकरणाद्वारे खाडीच्या पाण्यामध्ये शोधमोहीम राबविणार आहेत.
हत्येनंतर बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे गोणीमध्ये भरून खाडीत टाकले. त्या गोणी पाण्यावर तरंगू नये, यासाठी गोणीमध्ये जड धातू ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सुमारे १० मीटरच्या अंतरातच खाडीच्या तळाशी गोणीतील मृतदेह आढळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, धातूचा शोध घेऊन मृतदेहाचे अंश मिळविण्याकरिता ग्रॅडिओमीटर वापरले जाणार आहे. त्यामधून मृतदेहाविषयीची माहिती हाती लागेल, असाही पोलिसांचा विश्वास आहे.