नवी मुंबईत शिवसेना उबाठा गटाला खिंडार; शहरप्रमुखासह उपजिल्हा प्रमुख शिवसेनेत
By नामदेव मोरे | Published: December 18, 2023 07:21 PM2023-12-18T19:21:29+5:302023-12-18T19:22:41+5:30
उबाठा गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेण्यास सुरुवात झाली आहे.
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पुन्हा खिंडार पडले आहे. शहरप्रमुख विजय माने, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, मिलिंद सुर्याराव यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्येही पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. उबाठा गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सानपाडा येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये उबाठा गटाचे शहर प्रमुख विजय माने, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, मिलींद सुर्याराव, माजी नगरसेवक मनोहर जोशी, संजय भोसले यांच्यासह जवळपास १३० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, विजय नाहटा, विजय चौगुले, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील यांच्यासह इतर इतर पदाधिकारी उपस्थित होते.