मोठी बातमी: ‘एमएमआरडीए’साठी एकच परिवहन सेवा?; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती दोन महिन्यांत देणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:41 IST2025-01-31T09:41:17+5:302025-01-31T09:41:44+5:30

वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून, या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Big News Single Transport Service for MMRDA The committee of senior officers will report in two months | मोठी बातमी: ‘एमएमआरडीए’साठी एकच परिवहन सेवा?; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती दोन महिन्यांत देणार अहवाल

मोठी बातमी: ‘एमएमआरडीए’साठी एकच परिवहन सेवा?; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती दोन महिन्यांत देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशासाठी एकच परिवहन प्राधिकरण सेवा असावी, यादृष्टीने राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकले  आहे. सध्या मुंबईची बेस्ट, नवी मुंबईची एनएमएमटी, ठाण्याची टीएमटी, कल्याण-डोंबिवलीची केडीएमटीसह वसई-विरार पालिकेची स्वतंत्र परिवहन  सेवा आहे. मात्र, या सर्व प्राधिकरण सेवांचे एकत्रिकरण करून एकीकृत प्राधिकरण स्थापन करण्याचे नगरविकास विभागाने ठरविले  आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून, या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

या समितीत बेस्टच्या महाव्यवस्थापक अश्विनी जोशी, नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाणे पालिका आयुक्त सौरभ  राव, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचा समावेश आहे.मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, पनवेल परिसरात नागरिकरण होत आहे. 

वसई-विरार, पालघर या शहरांतही औद्योगिकीकरण वाढले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, उरण-द्रोणागिरी पट्ट्यातील नियोजित तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकरणही वेग पकडणार आहे. 
यामुळे महानगर प्रदेशातील परिवहन व्यवस्थांचे नियंत्रण, व्यवस्थापन एकाच व्यवस्थेमार्फत करता येईल का, याचा अभ्यास करून या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे.

नियंत्रणासाठी प्राधिकरण स्थापन करणार
महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एमएमआरडीए, सर्व पालिका, पोलिस यंत्रणेत समन्वय साधून कनेक्टिव्हिटी वाढून शहरांतील रहिवाशांचा प्रवास सुकर, सुसज्ज व्हावा यासाठी नवे परिवहन प्राधिकरण स्थापन करता येईल का? या परिवहन प्राधिकरणास वैधानिक दर्जा देता येईल का? तसेच त्याची कार्यपद्धती नेमकी कशी असेल, नियंत्रण कसे ठेवता येईल? याचा अभ्याससुद्धा समितीने करायचा आहे.

...म्हणून एकीकृत परिवहनचा विचार
सध्या वसई-विरार पालिकेची परिवहन सेवा बेताचीच आहे. उल्हासनगरची परिवहन कागदावरच आहे. पनवेलने आता बससेवेसाठी सल्लागार नेमला आहे. भिवंडीत गोदामपट्टा व अपर ठाणेतील गृहप्रकल्प वाढत आहेत.  एमएमआरडीए भागात तिसरी मुंबई वसणार आहे.  यामुळे भविष्यात रेल्वे-मेट्रो स्थानकापासून शहराच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी बससेवा फायदेशीर ठरणार आहे. यामुळेच महामुंबईसाठी एकीकृत परिवहन सेवेचा विचार पुढे आला आहे.

Web Title: Big News Single Transport Service for MMRDA The committee of senior officers will report in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.