डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याच्या लढ्याला मोठे यश, विशेष समितीची स्थापना

By कमलाकर कांबळे | Published: July 9, 2024 07:15 PM2024-07-09T19:15:09+5:302024-07-09T19:15:35+5:30

DPS Flamingo Lake : पुढील दोन महिन्यांत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.

Big success in fight to save DPS Flamingo Lake, special committee set up | डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याच्या लढ्याला मोठे यश, विशेष समितीची स्थापना

डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याच्या लढ्याला मोठे यश, विशेष समितीची स्थापना

नवी मुंबई : नेरूळ येथील ३० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या डीपीएस फ्लेमिंगो तलावाचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली असून, येथील फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास आणि कांदळवनाचे संरक्षण करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी विशेष समिती गठीत केली आहे. वनविभागाचे प्रधान सचिव हे या समितीचे अध्यक्ष असून, इतर आठ जणांचा यात समावेश करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांत यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.

नेरूळ येथील डीपीएस तलाव फ्लेमिंगो पक्षांचे अधिवास क्षेत्र आहे. काही महिन्यांपूर्वी डीपीएस तलावाजवळ स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या पर्यावरणप्रेमींनी तलाव आणि परिसरातील कांदळवन क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तर सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार संजय केळकर आणि आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित करून याप्रकरणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विशेष समिती गठीत करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार ही विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

गणेश नाईक यांनी दिला होता इशारा
या तलावात भरतीचे प्रवाह येण्यासाठी असलेले चोक पॉईंट सिडकोने बुजविले हाेते. त्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रोश केल्यानंतर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी स्वत: पाहणी करून हे चोक पॉईंट काढून टाकण्याचे निर्देश महापालिका आणि संबधित यंत्रणांना दिले होते. तसेच कार्यवाही न झाल्यास स्वत: जेसीबी लावून ते काढून टाकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर नवी मुंबई महापालिकेने चोक पॉईंट काढून टाकले होते. त्यामुळे सिडकोने याप्रकरणी थेट महापालिकेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत
डीपीएस फ्लेमिंगो तलाव आणि परिसरातील कांदळवन क्षेत्राच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष उच्चस्तरीय समितीचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. या प्रक्रियेत आता लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नेट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी म्हटले आहे. तसेच फ्लेमिंगो तलावाच्या संरक्षणासाठी विविध स्तरावर संघर्ष करणाऱ्या नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटी, सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हज फोरम आणि खारघर हिल अँड वेटलँड ग्रुप या पर्यावरणवादी संस्थांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

वनविभागाचे प्रधान सचिव समितीचे अध्यक्ष
वनविभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर सदस्य म्हणून प्रधान सचिव (पर्यावरण), प्रधान सचिव (नगर विकास-१), व्यवस्थापकीय संचालक (सिडको), आयुक्त (नवी मुंबई महापालिका), मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड), जिल्हाधिकारी (ठाणे), अध्यक्ष (बीएनएचएस) आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Big success in fight to save DPS Flamingo Lake, special committee set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.