शहराला भारनियमनाचे चटके, विजनिर्मिती आणि पुरवठ्यात मोठी तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:31 AM2017-10-06T02:31:18+5:302017-10-06T02:31:28+5:30
विजेची निर्मिती आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत भारनियमन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : विजेची निर्मिती आणि पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत भारनियमन करण्यात आले आहे. त्याची झळ आता सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणारी नवी मुंबई शहरालाही बसली आहे. शहरात गुरुवारपासून सरासरी चार तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.
शुक्रवारपासून फिफाला सुरुवात होणार असून, या काळात होणा-या या भारनियमनामुळे फुटबॉलप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील विविध विभागांमध्ये सकाळी दोन तास आणि दुपारी दोन तास लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. आॅक्टोबर हिटमुळे आधीच हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना आता भारनियमनाचाही त्रास सहन करावा लागणार आहे.
या भारनियमनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. जोपर्यंत कोळशाचा
पुरवठा आणि मागणीचे गणित सुटणार नाही तोपर्यंत हे भारनियमन सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण विभागाच्या अभियंत्यांनी दिली.