मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा सर्वांत मोठा धक्का माथाडी कामगारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:32 AM2021-05-06T00:32:46+5:302021-05-06T00:33:06+5:30
४१ वर्षांचा लढा अपूर्णच : आरक्षणासाठी दोन पिढ्यांचा अविरत संघर्ष सुरूच
नामदेव मोरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये मराठा महासंघाची स्थापना करून लढा उभा केला. दोन वर्षांच्या लढ्यानंतरही सरकारने आरक्षण न दिल्यामुळे १९८२ मध्ये अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली. त्यानंतरही कामगारांनी हा लढा सुरूच ठेवला आहे. चळवळीतील सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले होते. न्याय मिळेल, असे वाटत असताना अचानकच आरक्षण रद्द झाल्याचे वृत्त समजताच सर्वांत मोठा धक्का आरक्षणासाठी दाेन पिढ्यांपासून लढणाऱ्या माथाडी कामगारांना बसला आहे.
ऐंशीच्या दशकामध्ये मुंबईत माथाडी कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ उभी केली. संघर्ष करून हमाल, श्रमजीवी कामगारांसाठी देशातील पहिला माथाडी कायदा निर्माण करण्यास भाग पाडले. कामगारांची चळवळ उभी करताना मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेपण त्यांच्या निदर्शनास आले. एकीकडे राज्यातील सत्तास्थानावर मराठा समाजातील नेते व दुसरीकडे समाजातील मोठा वर्ग अल्पभूधारक शेतकरी किंवा मुंबई व इतर शहरांत मजुरी करत असल्याचे वास्तव त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित केले. १९८० मध्ये मराठा महासंघाची स्थापना करून आरक्षणासाठीची चळवळ सुरू झाली. माथाडीचा मुलगा माथाडीच होणार नाही. तो शिकला पाहिजे व त्याला आरक्षणाचा लाभ मिळून तोही अधिकारी झाला पाहिजे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो कामगार या चळवळीमध्ये सहभागी झाले. २२ मार्चला भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना अण्णासाहेब पाटील यांनी सरकारला आव्हान दिले. समाजाला आरक्षण जाहीर करा, नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. सरकारने गांभीर्याने घेतले नाही व सूर्योदयापूर्वीच अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली.
माथाडी कामगारांनी चार दशकांपासून आरक्षणासाठीचा लढा सुरूच ठेवला. मराठा महासंघ व इतर संघटनांनीही लढ्याला बळ दिले. समाजाला आरक्षण मिळवून देऊन आपल्या नेत्याला खरी आदरांजली वाहायची, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हजारो कामगार आरक्षणासाठीच्या लढ्यात सहभागी होत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्येही कामगारांचे योगदान मोठे होते. सरकारने आरक्षण जाहीर केल्यानंतर कामगारांनी जल्लोष केला होता. आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडावी यासाठीही पाठपुरावा केला होता. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे राज्यातील माथाडी कामगारांचे लक्ष लागले होते. न्यायालयाने आरक्षण रद्द केले व सर्वांनाच धक्का बसला. आरक्षणाचे स्वप्न धुळीस मिळाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.
अश्रू अनावर झाले
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांना अश्रू अनावर झाले. आरक्षणासाठी वडिलांनी प्राणाची आहुती दिली. कामगार वर्षानुवर्षे लढा देत आहे. अनेकांनी स्वत:चा प्राण गमावला असून, या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसल्याचे मत व्यक्त केले आहे.
माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी पहिले बलिदान दिले. कामगारांच्या दोन पिढ्या आरक्षणासाठीच्या चळवळीमध्ये सक्रिय असून, आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
- संतोष आहिरे,
मसाला मार्केट
कांदा बटाटा मार्केटमध्ये १९७८ पासून वडील कार्यरत होते. अद्याप चळवळीमध्ये सक्रिय आहेत. समाजाला आरक्षण मिळावे, हे प्रत्येक माथाडी कामगाराचे स्वप्न असून, ते स्वप्न आज भंग पावले.
-योगेश बर्गे,
कार्यकर्ते माथाडी संघटना