नवी मुंबई : पामबीच मार्गावर करावे येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या ६ च्या सुमारास हा अपघात घडला असून याप्रकरणी कार चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडला.पामबीच मार्गावर करावे येथील टी. एस. चाणक्य चौकात हा भीषण अपघात घडला. त्यामध्ये मनोजकुमार वर्मा (२५) हा जागीच मृत पावला आहे. तो करावेचा राहणारा असून दूध वितरक आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो एनआरआय कॉम्प्लेक्स येथे दूध पोचवून दुचाकीवरून परत करावेकडे येत होता. यावेळी चाणक्य चौकात तो करावेकडे वळण घेत असताना वाशीकडून बेलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्याला धडक दिली. अपघातावेळी कार अति वेगात असल्याने मनोजकुमार हा दुसऱ्या लेनवर फेकला जाऊन रस्त्यालगच्या झाडीत अडकला. तर कार देखील अनेक पलट्या घेत विरुद्ध दिशेच्या मार्गावर काही अंतरावर जाऊन पडली. परंतु कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून ऐरबॅगमुळे थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. अपघातानंतर त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली असता, काहींनी रुग्णवाहिकेला देखील कळवले. तर काही वेळातच वाहतूक पोलीस व एनआरआय पोलीस देखील त्याठिकाणी दाखल झाले.गंभीर जखमी अवस्थेतील मनोजकुमार हा सुमारे अर्धा तास मदतीच्या प्रतीक्षेत पडून होता. अखेर निखिल जाधव हा तरुण खासगी रुग्णवाहिका घेऊन आल्यानंतर मनोजकुमारला झाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत मदतीच्या प्रतीक्षेत त्याने प्राण गमावले होते. या अपघात प्रकरणी कार चालक अक्षय सुर्वे (२५) विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वाशीचा राहनारा असून त्याने भरधाव वेगात कार पळवल्याने हि दुर्घटना घडली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले. पामबीचवर रुग्णवाहिकेची कमीपामबीच मार्गावर भरधाव वेगात वाहने पळवली जात असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. अशावेळी जखमीला तात्काळ मदत मिळण्यास त्याचे प्राण वाचू शकतात. परंतु बहुतांश अपघातांमध्ये रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने जखमींवर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. तर अनेकदा नागरिक वेळेवर उपलब्ध वाहनांमधून जखमीला रुग्णालयात दाखल करतात. त्यामुळे पामबीच मार्गावर एकतरी रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्याची गरज भासत आहे.
वेगावर नियंत्रण नाहीक्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग भरधाव वाहनांमुळे जीवघेणा ठरत आहे. चौकांच्या ठिकाणी सिग्नल असून देखील सिग्नलवर थांबणे काहींना पसंद पडत नाही. त्यामुळे सिग्नल तोडण्यासह, अधिकाधिक वेगात वाहन पळवण्याचा छंद काही चालकांकडून जोपासला जात आहे. त्यातूनच आजवर अनेक अपघात घडले असून त्यात काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत.