वीज मीटर बसविण्यापूर्वी पाठविले बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:34 AM2018-09-09T02:34:55+5:302018-09-09T02:35:05+5:30
खेरणे येथील एका वीज ग्राहकाला महावितरणकडून वीज मीटर बसण्यापूर्वीच एक हजार ५७0 रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे.
- मयूर तांबडे
पनवेल : तालुक्यातील खेरणे येथील एका वीज ग्राहकाला महावितरणकडून वीज मीटर बसण्यापूर्वीच एक हजार ५७0 रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
नावडे विभागातील खेरणे येथील जयदेव अनंत गोंधळी यांनी आपल्या नवीन घरासाठी वीज मीटर मिळवण्यासाठी मे-जून महिन्यात महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र आजतागायत त्यांच्या घरी विजेचा मीटर बसलेला नाही. मात्र जयदेव गोंधळी यांना न बसलेल्या या मीटरचे चक्क एक हजार पाचशे सत्तर रु पयांचे बिल आल्यामुळे हे बिल कसे भरायचे असा प्रश्न गोंधळी यांना पडला आहे. या प्रकारामुळे महावितरणचा अजब कारभार समोर आला आहे. गोंधळी यांना १00 युनिटचे वीज बिल एक हजार ५७0 रु पये आलेले आहे. वीज मीटर बसलेले नसल्याने साहजिकच या वीज बिलावर मीटरचा फोटो छापण्यात आलेला नाही.
जयदेव गोंधळी यांना महावितरणकडून ४ जून रोजी विजेचा पुरवठा करण्यात आले असल्याचे विद्युत बिलावर लिहिलेले आहे. तर २३ जुलै २0१८ रोजी गोंधळी यांच्या घरी बसवलेल्या विद्युत मीटरची रीडिंग नेण्यात आली असल्याचे देखील विजेच्या बिलावर लिहिलेले आहे. प्रत्यक्षात मात्र गोंधळी यांच्या घरी विजेचे मीटर बसविलेलेच नाही. तरी देखील गोंधळी यांना महावितरणकडून १ हजार पाचशे सत्तर रु पयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे न बसवलेल्या विद्युत मीटरचे बिल कसे भरायचे असा प्रश्न जयदेव गोंधळी यांना पडला आहे. न बसलेल्या विद्युत मीटरचे बिल पाठवून महावितरणने ग्राहकांची थट्टाच उडवली आहे.
>वीज मीटर बसलेले नसल्याने या ग्राहकाला आलेले वीज बिल भरावे लागणार नाही.
- महेश सावंत, सहाय्यक अभियंता, नावडे विभाग, महावितरण