नवी मुंबई : विविध प्रकारच्या सशुल्क सुविधांच्या माध्यमातून नवी मुंबईपोलिसांच्या तिजोरीत १३ कोटी २९ लाख रुपयांची भर पडली आहे. विदेशी नागरिकांच्या नोंदणी, चारित्र पडताळणी यासह सभा व अतिक्रमणाला पुरवलेल्या बंदोबस्तांचा त्यात समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात अनेक मोठ्या राजकीय सभा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. त्याशिवाय लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत इतर धार्मिक कार्यक्रमही झाले. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पुरवण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यानुसार गतवर्षात अनेक खासगी समारंभांना पोलिसांनी सशुल्क बंदोबस्त पुरवला होता. त्यात नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या दोन संगीत कार्यक्रमांसह सत्संग कार्यक्रमाचाही समावेश होता.
अशा कार्यक्रमांना किमान ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे आयोजकांकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. पालिका व सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवार्इंनाही आवश्यकतेनुसार बंदोबस्त पुरवला जातो.
गतवर्षात एकूण ३१७ कारवार्इंना पोलिसांनी बंदोबस्त पुरवला होता. त्यापैकी ८९ कारवाई सिडकोमार्फत होत्या, तर २२८ कारवाई पालिकेच्या माध्यमातून केल्या होत्या. त्याद्वारे गतवर्षात नऊ कोटी ३४ लाख ८८ हजार ३४१ रुपयांचे शुल्क पोलिसांनी आकारले आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या परवान्यांच्या नूतनीकरणाद्वारे दोन कोटी २० लाख ८१६ रुपये प्राप्त झाले आहेत.
विदेशी नागरिक पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वास्तव्य करत असल्यास त्याच्या नोंदणीचेही शुल्क आकारले जाते. तर स्थानिक नागरिकांना शासकीय कामकाजासाठी लागणारा चारित्र पडताळणी अहवालही सशुल्क दिला जातो. त्यामधून एक कोटी ७४ लाख ९१ हजार २०५ रुपये मिळकत वर्षभरात झाली आहे. त्यानुसार गतवर्षात एकूण १३ कोटी २९ लाख ८० हजार ३६२ रुपये नवी मुंबई पोलिसांच्या तिजोरीत जमा झाले आहेत.