पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा गंडा, चौघांना अटक : १०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 06:39 AM2021-01-20T06:39:09+5:302021-01-20T07:14:55+5:30
सीबीडी सेक्टर १५ येथे वनिता इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीने नागरिकांकडून गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती.
नवी मुंबई : गुंतवलेल्या रकमेचे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने १०० हून अधिक गुंतवणूकदारांची २ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सीबीडी सेक्टर १५ येथे वनिता इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीने नागरिकांकडून गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी आर्थिक शाखा कक्ष १चे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये वनिता इंटरप्रायजेस कंपनीकडून त्रिशूल गोल्ड नावाने स्कीम चालवली जात असल्याचे उघड झाले. त्यांनी २०१७ पासून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी कंपनीचे प्रमुख वनिता पाटील व अभिजीत पाटील यांच्यासह मॅनेजर मुकुंद पुराणिकयांना सोमवारी रात्री अटक केली आहे.
कंपनीने नफा देणे केले होते बंद
सुरुवातीच्या काही व्यक्तींना २० महिन्यात गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम दिली होती. गुंतवलेल्या रकमेच्या दहा टक्के परतावा दर महिना देऊन २० महिन्यात दुप्पट रक्कम परत केली जाणार होती. त्यामुळे कंपनीवर विश्वास बसल्यानंतर गुंतवणूकदार वाढले असता मार्च २०२० पासून कंपनीने नफा देणे बंद केले होते. तेव्हापासून गुंतवणूकदार कार्यालयात फेऱ्या मारत होते.