Kite Festival : घणसोलीत पक्षीमित्राने जखमी घुबडाला दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:13 PM2020-01-16T15:13:10+5:302020-01-16T15:13:52+5:30
Kite Festival : घणसोली गावचे पक्षीप्रेमी दिलीप दिनकर म्हात्रे यांना हे घुबड जखमी अवस्थेत आढळले.
अनंत पाटील
नवी मुंबई - ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवारी घणसोली डी मार्ट परिसरातील महापालिकेच्या वतीने रस्त्याचे डांबरी काम सुरू आहे. त्या ठिकाणी पेव्हर मशीनखाली घुबड हा पक्षी अडकलेला होता. घणसोली गावचे पक्षीप्रेमी दिलीप दिनकर म्हात्रे यांना हे घुबड जखमी अवस्थेत आढळले. या पक्ष्याच्या पायाला थोडं लागले होते. अशा जखमी अवस्थेत त्यांच्या प्रसंगावधानामुळे घुबडाला जीवदान मिळाले. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असताना एक पक्षी अडकलेला असल्याची माहिती ठेकेदाराला दिली. त्यानंतर सफाई कामगार म्हणून घणसोली येथे दिलीप म्हात्रे काम करतात. त्यावेळी घटनास्थळी म्हात्रे यांनी पेवर मशिनखाली अडकलेल्या या घुबडाला सुरक्षित बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.
दिलीप म्हात्रे हे पक्षीप्रेमी म्हणून नवी मुंबईत परिचित आहेत. जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना जीवदान देणारे अशी त्यांची ओळख आहे. आता त्यांच्याकडे तीन घारीची पिल्ले, एक “बोलका कावळा” आणि दोन पोपट आहेत. जखमी घारींवर उपचार करून त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांना सोडून देण्यात आले आहे. म्हात्रे यांना आतापर्यंत हे सर्व पक्षी जखमी अवस्थेत सापडले होते. या पक्षातील एका कावळ्याला बोलते करणारा दिलीप म्हात्रे महाराष्ट्रातील एकमेव पक्षीमित्र असल्याचे काही जाणकार पक्षीमित्रांकडून सांगण्यात येते. या जखमी घुबडाला वाचविण्याच्या कामात म्हात्रे यांचे सहकारी मित्र उदय पाटील, आनंद सूर्यवंशी यांनी त्यांना मदत केली.
आठ दिवसांत दिलीप म्हात्रे यांना दोन घुबड पक्षी जखमी अवस्थेत सापडले होते. त्यापैकी एक महापालिकेच्या घणसोली स्मशानभूमीत तेलाने माखलेल्या अवस्थेत सापडला होता. तर दुसरा पुष्पक भगवान म्हात्रे याने पकडून म्हात्रे यांच्याकडे आणला होता. तीन दिवसांपूर्वी या दोघांना उपचारानंतर सोडून दिल्याची माहिती त्यांनी “लोकमत”शी बोलताना दिली. एका पक्षी मित्राने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, आजमितीला जगात सुमारे २०४ प्रजातीची घुबडे आढळतात, तर भारतात यापैकी सुमारे ३८ प्रजाती आढळतात. जगातील सर्वात मोठे घुबड ब्लाकिश्तोन मत्स्य असून, सर्वात लहान एल्फ नावाचे घुबड आहे. आपल्याकडील गव्हाणी घुबड हे जगातील सर्वात सामान्य घुबड असून ते जगात सर्वत्र सापडते.”