पक्षी निरीक्षकांना स्थलांतरित दुर्मिळ 'पाईड व्हीटियर' पक्षाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:09 PM2024-01-01T19:09:10+5:302024-01-01T19:09:29+5:30
मधुकर ठाकूर उरण : हिवाळा लागताच महाराष्ट्रात स्थलांतरीत पक्षी फार मोठ्या संख्येने यायला सुरुवात करतात. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि ...
मधुकर ठाकूर
उरण : हिवाळा लागताच महाराष्ट्रात स्थलांतरीत पक्षी फार मोठ्या संख्येने यायला सुरुवात करतात. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत असतो.
रायगड जिल्ह्यातील पक्षी निरीक्षक वैभव पाटील, हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील हे २४ डिसेंबर रोजी साताऱ्यात असताना त्यांना साताऱ्यातील शिरवळ गावाजवळ शेतामध्ये 'पाईड व्हीटियर' या पक्षाचं दर्शन झालं
विशेष म्हणजे हा पक्षी यापूर्वी महाराष्ट्रात पाहिला गेलेला नसल्याने, महाराष्ट्राच्या पक्षी वैभवात एका नवीन पक्षाची भर पडलेली दिसून येत आहे. ओल्ड वर्ल्ड फ्लायकॅचर कुळातील हा पक्षी युरोप ते आफ्रिका आणि आग्नेय आशिया या भागात स्थलांतर करणारा असून तो भटकून महाराष्ट्रात आल्याची शक्यता पक्षी निरीक्षकांनी नोंदविली आहे. पाईड व्हीटियर या पक्षाच्या भारतातील लडाख, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, कर्नाटक अशा काही मोजक्याच नोंदी आहेत.
वैभव पाटील, हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील हे रायगड जिल्ह्यातील पक्षी निरीक्षक ' बहराई फाउंडेशन'मार्फत गेल्या काही वर्षापासून. पर्यावरणाशी संबंधित कामे करत आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यात रेड क्रेस्टेड पोचार्ड आणि कॉमन क्वेल या पक्षांची पाहिली नोंद केलेली आहे. इ-बर्ड या पक्षी निरीक्षण नोंदीच्या जागतिक संकेत स्थळावर रायगड जिल्ह्यामधून सर्वाधिक प्रजातींच्या नोंदी केलेल्या आहेत.