अनंत पाटील
नवी मुंबई : घणसोली गावामधील दिलीप म्हात्रे यांनी कावळ्यांसह शेकडो पक्ष्यांना रोज धान्य व पाणी देण्याचे अनेक वर्षांपासून सुरू ठेवले आहे. धान्य देण्याबरोबर जखमी पक्ष्यांवर उपचारही करत असून त्यांच्या घरामध्येही अनेक पक्ष्यांचा वावर सुरू असतो.खाडीकिनारी फिरत असताना चार वर्षांपूर्वी दिलीप म्हात्रे यांना कावळ्याचे पिल्लू सापडले. त्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा त्याच परिसरात सोडून दिले. तेव्हापासून रोज कावळ्यांना धान्य टाकण्याचा व जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यास सुरवात केली.
खाडीकिनारी जावून काव... कावचा आवाज काढला की काही वेळेमध्ये शेकडो कावळे जमा होवू लागले आहेत. घराच्या छतावरही धान्य भरलेले डबे व पाणी ठेवण्यास सुरवात केली आहे. महानगरपालिकेच्या घंटागाडीवर कंत्राटी कामगार असलेल्या म्हात्रे यांचे संपूर्ण कुटुंबच पक्षिप्रेमी बनले आहे. त्यांच्या घरात कावळा, पोपट व इतर पक्षी सहजपणे वावरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या घारीची चार पिल्लेही घरी आणली होती. त्यामधील तीन घारी सोडून दिल्या असून एक घरात इतर पक्ष्यांमध्ये रमली आहे.कावळाही बोलू लागला : दिलीप म्हात्रे यांच्या घरात येणारा कावळा त्यांची मुलगी तेजस्वी हिच्याबरोबर काही शब्दही उच्चारत असल्याचा दावाही केला आहे. कावळा बाय, टकल्या व राजा असे शब्द बोलत आहे.