दातांवरून कळणार जन्मतारीख?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2015 01:58 AM2015-08-20T01:58:10+5:302015-08-20T01:58:10+5:30

आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे

Birthdate to know from donors? | दातांवरून कळणार जन्मतारीख?

दातांवरून कळणार जन्मतारीख?

Next

नवी मुंबई : आपला जन्म नेमका कधी झाला हे ज्यांना माहीत नसते, अशांची जन्मतारीख दातांवरून शोधणे शक्य असल्याचा दावा, डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. आपल्या या संशोधनाला मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. जन्माची कसलीही नोंद नसलेल्या १०१ मुलांच्या दातांवर संशोधन करून त्यांनी त्यांच्या जन्मतारखा शोधून काढल्या आहेत.
अनेक अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतील मुलांना आपला वाढदिवस कधी असतो, हेच माहीत नसते. त्यामुळे इतरांप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची संधीच त्यांना मिळत नाही. जन्मतारखेची नोंद कुठेच नसल्याने त्यांच्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात. सरकारी कामे अडून राहतात, परंतु जन्माच्या काही वर्षांनंतरही जन्मतारीख शोधता येऊ शकते, असा दावा डॉ. जयकुमार जयरामन यांनी केला आहे. त्याकरिता दंतचिकित्सेत संशोधनातून त्यांनी विशेष पद्धत अवगत केली आहे.
आंध्रप्रदेश सरकारने या संशोधनाला मान्यता दिलेली असून महाराष्ट्र सरकारकडेही त्यांनी मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या संशोधनाची माहिती दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्याकरिता नेरुळच्या तेरणा डेंटल कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जयरामन यांच्या संशोधनातून जन्मतारीख मिळालेल्या १०१ मुलांना जन्मतारखेचे प्रमाणपत्र देण्यात आले. तेरणाचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या, डॉ. फरिन कटागिया, डॉ. शिशिर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या संशोधनाकरिता जन्मतारीखच माहीत नसलेल्या तुर्भे एमआयडीसी व इतर झोपडपट्टी परिसरातील मुले शोधण्यात आली होती. त्यांच्या दातांचे एक्स-रे काढून त्यावर केलेल्या संशोधनातून त्यांना जन्मतारीख देण्यात आली. त्यामुळे कधी न साजरा झालेला जन्मदिवस भविष्यात निश्चित तारखेला साजरा होणार असल्याचा उत्साह या गरीब कुटुंबातील मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. महाराष्ट्र राज्य शासनाने या संशोधनाला मान्यता देऊन त्याद्वारे अनेकांच्या जन्मतारखेचा प्रश्न सोडवण्याची गरज डॉ. जयरामन यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Birthdate to know from donors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.