लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : जन्मदिनाच्या आनंदात गाडीच्या रूफ टॉपवर फटाक्याची आतषबाजी करत पामबीच मार्गाने कार पळवल्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या व्हिडीओवरून पोलिसांनी कारचा शोध घेऊन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर कार पळवत त्यावर फटाक्यांची आतषबाजी करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. २९ जानेवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. किल्ला जंक्शन ते एनआरआय कॉम्प्लेक्स दरम्यान फॉर्च्युनर कार पळवत कारच्या रूफ टॉपवर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली होती. तर दुसऱ्या गाडीवर रामाचा झेंडा लावून सनरूफ मधून आतषबाजीचे व्हिडीओ बनवले जात होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एनआरआय पोलिसांकडून कारचा शोध सुरु होता. मात्र कारचा नंबरप्लेट फॅन्सी असल्याने व गाडीमालकाचा पत्ता मिळून येत नसल्याने पोलिसांपुढे अडचण येत होत्या. त्यानंतरही एनआरआय पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम, निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक स्वप्नील माने यांच्या पथकाने कारची माहिती मिळवून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरी येथे राहणाऱ्या नयन पाटील (२१) याचा जन्मदिवस असल्याने पामबीच मार्गावर मित्रांसह जन्मदिवस साजरा केला होता. त्यानंतर गाडीच्या रूफ टॉपवर फटाके फोडत कार पळवण्यात आली होती. यामुळे नयन पाटील व त्याचा मित्र वंश मिश्रा (२१) याच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे अपघाताला देखील आमंत्रण मिळू शकले असते. त्यामुळे आरटीओ कडून देखील संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.