शैलेश चव्हाण। लोकमत न्यूज नेटवर्कतळोजा : पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता प्रचारकर्त्यांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. उन्हातान्हात फिरणाऱ्या प्रचारकर्त्यांसाठी जेवण, पाणी, थंड पेय यांची व्यवस्था केली जात आहे. यासाठी शहरातील कॅटरर्स चालकांकडे विविध मेजवानीचे मेनू तयार असून चमचमीत पदार्थ उमेदवारांच्या कार्यालयाच्या ठिकाणी पोहचवले जात आहेत .प्रचार म्हटल्यावर प्रचारकर्त्यांना मोबदला व त्याचबरोबर त्यांच्या खानपानाची चंगळ आलीच. निवडणुकीच्या काळात प्रचारकर्त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी राजकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. कॅटरर्स चालकांकडे बिर्याणी, पुलाव, पुरी भाजी, बटाटा वडा या पदार्थांची विशेष मागणी वाढत आहे. यामध्ये पुलाव व बिर्याणी यांची सध्या जोरदार विक्र ी सुरू आहे. त्यामुळे बिर्याणी, पुलाव यांचे दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. आधी ११० रुपयांना मिळणारी एक प्लेट बिर्याणी आता १३०/१५० रुपयांना मिळत आहे. शाकाहारी पुलावची किंमत १२० ते १३० रुपये इतकी झाली आहे. निवडणुकीच्या काळात कॅटरर्स व्यवसाय सध्या तेजीत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी कॅटरर्स, हॉटेल व्यावसायिक, घरगुती महिला बचत गटांच्या खानावळी सज्ज झालेल्या असून शुद्ध, दर्जेदार तसेच स्वादिष्ट पदार्थ खवय्यांना आवडतील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
बिर्याणीचे दर वाढले
By admin | Published: May 09, 2017 1:31 AM