‘लोकमत’चा अंदाज अचूक; भाजप आणि गणेश नाईकांचे प्रवेशावेळी शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:58 AM2019-09-09T01:58:35+5:302019-09-09T01:58:50+5:30
बुधवारी मुख्यमंत्र्यांसह नेते राहणार हजर
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी ११ सप्टेंबरचा मुहूर्त ठरल्याचे रविवारी अधिकृतपणे जाहीर झाले. याबाबतचे वृत्त लोकमतने रविवारच्याच अंकात प्रसिद्ध केले होते. वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सायंकाळी ५ वाजता नाईक आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल होतील.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती संजीव नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली.
गणेश नाईक हे नवी मुंबईचे नव्हे, तर पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्याचे आणि नवी मुंबईशी जोडलेल्या रायगडचेही नेते असल्याचे दाखवून देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांचे मोठे शक्तीप्रदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाला ठाणे, पालघर, रायगडमधील भाजपचे आमदार-खासदारांना बोलावून भाजपही आपली ताकद दाखवून देण्याच्या तयारीत आहे.
नाईक यांच्या भाजप प्रवेशाची महिनाभरापासून चर्चा सुरू आहे. संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नाईक स्वत: भाजपमध्ये केव्हा प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यासाठी अगोदर ९ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने तो पुढे ढकलून ११ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. यावेळी गणेश नाईक यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक हे भाजपत प्रवेश करतील. याखेरीज ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी
नगरसेवक व राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी, विविध समित्यांचे सभापती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संजीव नाईक म्हणाले.
महापालिकेत सत्तांतर
नाईक यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ताही जाणार हे निश्चित झाले. सोमवारी राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करतील, सांगितले जाते. या वेगळ्या गटात नक्की किती नगरसेवक सहभागी हातील, याबाबत संभ्रम आहे. यासंदर्भात संजीव नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.