नवी मुंबईतील दोन्ही जागांवर भाजपचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:30 AM2019-10-01T06:30:19+5:302019-10-01T06:30:35+5:30

विधानसभेच्या बेलापूर आणि ऐरोली जागेवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे, परंतु भाजपला हव्या असलेल्या नवी मुंबईतील जागा मिळतीलच

BJP claims both seats in Navi Mumbai | नवी मुंबईतील दोन्ही जागांवर भाजपचा दावा

नवी मुंबईतील दोन्ही जागांवर भाजपचा दावा

googlenewsNext

नवी मुंबई : विधानसभेच्या बेलापूर आणि ऐरोली जागेवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे, परंतु भाजपला हव्या असलेल्या नवी मुंबईतील जागा मिळतीलच, असा विश्वास व्यक्त करीत राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघावर भाजपचाच हक्क असल्याचे सूचक विधान केले.
वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये सोमवारी आयोजित ‘कॉफी विथ युथ’ या कार्यक्रमात विनोद तावडे यांनी नव मतदारांशी संवाद साधला. भाजप-शिवसेनेच्या युतीचा निर्णय अद्यापी अधांतरी आहे. काही जागांवरून दोन्ही पक्षांत धुसफूस आहे. विशेषत: नवी मुंबईतील बेलापूरच्या जागेवर शिवसेनेने दावा ठोकल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलापूर मतदार संघ सध्या भाजपकडे आहे. मागील निवडणुकीत येथून मंदा म्हात्रे या मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. मात्र, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दोनपैकी बेलापूर मतदार संघांवर शिवसेनेने आपला दावा ठोकला आहे. तर ऐरोली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेले संदीप नाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐरोलीतून त्यांनाच भाजपचे तिकीट मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेकडून बेलापूर मतदार संघावर दावा ठोकला जात असला, तरी नवी मुंबईतील दोन्ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा अर्थ तावडे यांच्या सूचक विधानातून काढला जात आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, डॉ. राजेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: BJP claims both seats in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.