भाजपा नगरसेवकाच्या घरातच अद्याप वीज नाही, ‘मी लाभार्थी’चा विरोधाभास, आदिवासीवाडी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:52 AM2017-11-19T04:52:48+5:302017-11-19T04:53:21+5:30
भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे.
- वैभव गायकर
पनवेल : भाजपाची ‘मी लाभार्थी’ जाहिरात सध्या सर्वत्र झळकत आहे. सरकारी योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला कशाप्रकारे मिळाला आहे, याची माहिती या जाहिरातीतून देण्यात येत आहे. मात्र, पनवेल महापालिकेतील एका आदिवासी नगरसेवकाच्या घरात अद्याप वीज पोहोचली नसल्याने भाजपाच्या ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा विरोधाभास दिसून येत आहे. महादेव मधे, असे या नगरसेवकाचे नाव असून यासंदर्भात पनवेलच्या सर्वसाधारण महासभेत शनिवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला.
महादेव मधे हे पनवेल महापालिकेच्या प्रभाग ९मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. पनवेल तालुक्यातील टेंभोडे परिसरात वार्घ्याची वाडी आणि सागवाडी या दोन आदिवासी वाड्या आहेत. यापैकी वार्घ्याच्या वाडीत महादेव मधे हे कुटुंबासमवेत राहतात. मात्र, देशाच्या स्वातंत्र्याला ६९ वर्षे झाली असतानाही पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासीवाडीत अद्याप वीज पोहोचलेली नाही.
महापालिकेत निवडून आले, तरी महादेव यांच्या गावात वीज पोहोचली नसल्याने त्यांना कायम स्थानिक रहिवाशांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेकडे मागील दोन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनामार्फत चालढकल केली जात असल्याचा आरोप मधे यांनी महासभेत केला आहे. विशेष म्हणजे, राज्यभर भाजपा आपल्या विकासकामांचा ढोल पिटत असताना, खुद्द भाजपा नगरसेवकाचे गाव अंधारात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यावर वार्घ्याच्या वाडीपर्यंत वीजपुरवठा देण्यासंदर्भात काम सुरू असून टेंडर प्रक्रि या सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगरसेवकाच्या घरापर्यंत वीजपुरवठा पोहोचला नसेल, तर इतरांचे काय? असाही प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला.
- पनवेल महापालिकेच्या सभागृहात सर्वच नगरसेवकांनी महादेव मधे यांची बाजू घेत, प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पनवेल तालुक्यात अनेक आदिवासीपाड्यांचा समावेश आहे. मात्र, नगरसेवक महादेव मधे यांनी आदिवासीपाड्यातील मुद्दा उपस्थित केल्याने तालुक्यातील सर्वच आदिवासीवाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.
आमच्या आदिवासीवाडीत कित्येक वर्षे वीज पोहोचलेली नाही. मी नगरसेवक असल्याने माझ्या प्रभागातील रहिवाशांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकांशी चर्चा करण्यास गेलो असता, ‘ते आधी तुझ्या घरात वीजजोडणी घे, नंतर आमच्या समस्या सोडव’, असा प्रतिप्रश्न करतात. याबाबत महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाºयांनाही वारंवार कळवले आहे. मात्र, तरीही अद्याप आदिवासीवाडी वीजपुरवठा झालेला नाही.
- महादेव मधे, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका