“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 03:13 PM2024-09-25T15:13:22+5:302024-09-25T15:17:23+5:30
Devendra Fadnavis News: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis News: आपण सारथी सारखी संस्था तयार केली. उच्च शिक्षणात मराठा समाजाचा टक्का वाढावा, आयएएस, आयपीएस अधिकारी तयार व्हावेत, त्यासाठी सारथीची निर्मिती केली. सारथीच्या माध्यमातून एकूण ५१ विद्यार्थी युपीएससी पास झाले. त्यापैकी १२ आयएएस, १८ आयपीएस झाले. ४८० एमपीएससी तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर अशा विविध पदांवर आहेत. सारथीमुळे आमचे कल्याण झाल्याची भावना समाजात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यांवर आहेत. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला आहे. मराठा समजाला नोकरीत देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. कोणाचे म्हणणे वेगळे असेल, पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की, मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
हे नरेंद्र पाटील यांचे श्रेय आहे
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्वी इतके कार्यरत नव्हते. त्यावेळी नरेंद्र पाटील याना विनंती केली. हे महामंडळ बंद असल्यासारखे आहे, तुम्ही जबाबदारी घ्या, पैशाची कमतरता पडू देणार नाही, असे त्यांना सांगितले. मराठा समाजात उद्योजक निर्माण करण्यासाठी हे सुरु केले होते. खरोखर सांगतो की, जे काम आर्थिक विकास महामंडळात नरेंद्र पाटील यांनी काम करुन दाखवले तसे देशात झाले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवले. ८००० कोटी पेक्षा जास्तीच कर्ज दिले. मराठा समाजाचे तरुण आता नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झाले आहेत. हे नरेंद्र पाटील यांचे श्रेय आहे. ते पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात फिरले, प्रसंगी बँकांशी भांडले. माथाडी आणि मराठा हे दोन विषय आले की, नरेंद्र पाटील सरकारलाही सोडत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.