पनवेल : पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज शुक्र वारी (११ मे) तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले.पनवेल तालुक्यातील ओवळे, कोन, चिखले, न्हावे, भिंगार, कसळखंड, दापोली, गिरवले, मालडुंगे, दुंदरे, गुळसुंदे, तुराडे, वावेघर आणि सोमटणे या १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे; तर उलवे ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. या वेळी सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने रंगत वाढल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर भाजपा व मित्रपक्षांच्या उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी पनवेल तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरु ण भगत, काँग्रेसचे महेंद्र घरत, शेकापचे जितेंद्र म्हात्रे, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, कान्हा ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्हावे, कोन, मालडुंगे, गुळसुंदे, तुराडे ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे अर्ज शुक्र वारी दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपा काहीठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील युती करून लढत आहे.अर्जांची छाननी १४ मे रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.मतदान २७ मे रोजी सकाळी ७.३0 ते सायं. ५.३0 वाजेपर्यंत; तर मतमोजणी २८ मे रोजी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 5:58 AM