जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर भाजपा ठरली प्रभावी
By admin | Published: December 31, 2016 04:34 AM2016-12-31T04:34:58+5:302016-12-31T04:34:58+5:30
शहरवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यात या वर्षात भाजपाला चांगलेच यश आले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अनेक
नवी मुंबई : शहरवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यात या वर्षात भाजपाला चांगलेच यश आले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. विशेषत: सिडकोच्या जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, महाराष्ट्र सदनची निर्मिती, मरिना, जलवाहतुकीच्या प्रकल्पाला चालना आणि ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याची डागडुजी आदी रखडलेल्या प्रश्नांवर या काळात सकारात्मक निर्णय झाले. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विविध आघाड्यांवर बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.
मावळत्या वर्षात बेकायदा बांधकामांवरील कारवाईचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला. महापालिकेने गावठाणातील सरसकट सर्वच बांधकामांना नोटिसा पाठविल्याने प्रकल्पग्रस्त संतापले. आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्याला व्यापारी, माथाडी व किरकोळ विक्रेत्यांनीही पाठिंबा दर्शविला. आमदार मंदा म्हात्रे यांनी याप्रकरणी यशस्वी मध्यस्थी करीत मुख्यमंत्र्यांकडून महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळविली. या संपूर्ण घडामोडीत राष्ट्रवादीचा सहभाग केवळ नावापुरता दिसून आला. तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका मात्र संभ्रमात टाकणारी ठरली.
गरजेपोटीच्या बांधकामांबरोबरच भाजपाने शहरी भागात बैठ्या चाळीतून उदरनिर्वाहाच्या दृष्टीने झालेली वाढीव बांधकामे, मार्जिनल स्पेस व हॉटेल चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आमदार मंदा म्हात्रे यांनी याप्रकरणी थेट महापालिका आयुक्तांशी संवाद साधून सकारात्मक तोडगा काढण्याची विनंती केली. वर्षाच्या सुरूवातीला दीर्घकाळ रखडलेला अडीच एफएसआयचा प्रश्नही निकाली काढण्यात भाजपाला मोठे यश प्राप्त झाले. तर महापालिकेच्या दप्तरी अनधिकृत म्हणून ठप्पा लागलेल्या कुकशेत गावाला अधिकृततेचा दर्जा मिळवून देण्यात आमदार म्हात्रे यशस्वी ठरल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कुकशेत गावातील २८0 कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. एपीएमसीच्या भाजीमार्केटमधील ३८५ गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्यांनी पुरातत्व विभाग व सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद देत सिडकोने बेलापूर किल्ल्याची डागडुजी व संवर्धनासाठी दहा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच त्याचे कामही सुरू केले जाणार आहे.
पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र सदनाच्या निर्मितीसाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपाच्या माध्यमातून यशस्वी पाठपुरावा केला. त्यानुसार सदन निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय पारंपरिक मासळी विक्रेते, मिठागार कामगारांचे पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न, एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आदीसंदर्भात त्यांनी विविध स्तरावर मावळत्या वर्षात सक्षमरीत्या पाठपुरावा केला.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका
गरजेपोटी बांधकामे नियमित करण्यासाठी समूह विकास योजना राबवावी, तसेच ही बांधलेली घरे नियमित केल्याचे प्रोव्हिजनला प्रमाणपत्र मिळावे, २0१५ पर्यंतची गरजेपोटीची बांधकामे नियमित करावीत, गावठाणापासून २०० मीटर हद्दीच्या बाहेर असलेल्या वडिलोपार्जित घरांना नियमित करावे, घरे नियमित करताना वाढीव चटई निर्देशांकचा दर निश्चित करावा, जमिनी फ्री होल्ड कराव्या, साडेबारा टक्के योजनेअंतर्गत कमी करण्यात आलेल्या ३.७५ टक्के भूखंडाचा टीडीआर देवू करावा आदी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी भाजपाची आग्रही भूमिका राहिली आहे.