नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थक ४८ नगरसेवकांनी वेगळा गट तयार करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. महापौर, स्थायी समिती सदस्यांसह एकूण सहा समर्थक नगरसेवक राष्ट्रवादी काँगे्रसमध्येच राहणार आहेत. महापौरपदाची निवडणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाईक परिवार भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असे बोलले जात होते. महापौरांसह नाईक समर्थक ५५ नगरसेवक वेगळा गट तयार करणार, असे बोलले जात होते. सोमवार, ९ सप्टेंबरला नगरसेवक कोकण भवनमध्ये जाऊन वेगळा गट करण्याचे निवेदन दिले जाणार होते; परंतु सर्व नगरसेवकांच्या सह्या न मिळाल्यामुळे निवेदन दिले नाही. कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याचे कारण देण्यात आले होते. पुढील २४ तास सर्व नगरसेवकांच्यासह्या मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. कायदेशीर अडचणींची माहितीही घेतली जात होती. महापौरांसह सर्व नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास महापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती. यामुळे महापौर जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती नवीन गवते, जयश्री ठाकूर, लीलाधर नाईक, उषा भोईर व लता मढवी यांना राष्ट्रवादीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापौर, स्थायी समिती सभापतीसह सहा नगरसेवक वगळता उर्वरित ४८ नगरसेवकांच्या सह्यांचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे गटनेते रामचंद्र घरत यांना देण्यात आले आहे. सभागृहनेते रवींद्र इथापे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यापुढे घरत हेच या सर्व नगरसेवकांचे गटनेते राहणार आहेत. यामुळे आता महानगरपालिकेमध्ये महापौर नाईक समर्थक असला तरी त्यांचा पक्ष राष्ट्रवादीच राहणार आहे. याविषयी राष्ट्रवादी काँगे्रस नक्की काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.
नगरसेवकपद रद्द करण्यासाठी अर्ज करणार१) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अशोक गावडे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नियमाप्रमाणे ठरावीक नगरसेवकांना वेगळा गट तयार करता येत नाही. तांत्रिक अडचणी लक्षात आल्यामुळे महापौरांसह सहा जणांनी भाजपमध्ये प्रवेश करणे टाळले आहे. ज्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे किंवा वेगळा गट केल्याचा दावा केला आहे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी आम्ही तत्काळ केली आहे. नाईकांनी स्वार्थासाठी या नगरसेवकांचा बळी घेतल्याची टीकाही त्यांनी केली आहे. याविषयी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप पालिकेत सर्वात मोठा पक्ष२) नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून कोणत्याच निवडणुकीमध्ये भाजपला प्रभाव पाडता आला नाही. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये एकही नगरसेवक निवडून आला नाही. २००५ च्या निवडणुकीमध्ये भरत जाधव हे एकमेव उमेदवार निवडून आले. २०१० च्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजया घरत या एकमेव नगरसेविका निवडून आल्या. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले. गणेश नाईक समर्थक ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता भाजपचे सभागृहातील संख्याबळ ५४ एवढे होणार आहे. भाजप पहिल्यांदा महापालिकेमधील सर्वात मोठा पक्ष झाला आहे.