नवी मुंबईच्या १११ प्रभागात भाजपाने राबविले स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा प्रातिनिधिक सत्कार
By कमलाकर कांबळे | Published: October 1, 2023 04:53 PM2023-10-01T16:53:22+5:302023-10-01T16:54:09+5:30
या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.
नवी मुंबई: भाजपाचेनवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा पासून बेलापूर पर्यंत १११ प्रभागांमध्ये शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये लोकप्रतिनिधी, युवक,युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था अशा सर्व घटकांचा मोठा लोकसहभाग लाभला.
शहरातील गाव गावठाण ,शहरी भाग, झोपडपट्टी, औद्योगिक परिसर, वाणिज्यिक संकुले ,रेल्वे स्थानके, सार्वजनिक परिसर ,सोसायटी, उद्याने मैदाने ,चौक अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
वाशी सेक्टर १० ए या ठिकाणी सागर किनारी स्वच्छता मोहीम पार पडली. सागरी किनारी पसरलेला कचरा स्वच्छ करण्यात आला. या परिसरात खारफुटीचे संरक्षण करणारे खारफुटी मार्शल संस्थेचे पर्यावरण संरक्षक कार्यकर्ते रोहित मल्होत्रा आणि त्यांचे सहकारी देखील सहभागी झाले होते.
संत गाडगेबाबा महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत सर्वांनी स्वच्छतेचे महत्व सांगितल्याचे नमूद करून ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची निर्मिती होते. आरोग्य उत्तम प्रकारे राखले जाते, असे प्रतिपादन यावेळी गणेश नाईक यांनी केले. तर स्वच्छता अभियान एक दिवस नाही तर वर्षातले ३६५ दिवस स्वच्छतेची सवय जपावी, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले. नवी मुंबई शहर स्वच्छतेचा पुरस्कार, स्वीकार आणि आचरण करणारे शहर असून नागरिकांनी स्वच्छतेचा विचार आणि संस्कार पुढच्या पिढीच्या मनावर बिंबवायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यानिमित्त गणेश नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताच्या निर्मितीचे स्वप्न बाळगले असून ते साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी ऐरोली येथील राष्ट्रीय स्वच्छता अभियान प्रसंगी केले. आपल्याकडून अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि आपले शहर स्वच्छ कसे राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर नाईक यांनी यावेळी दिला.