नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी

By नारायण जाधव | Published: January 14, 2024 05:37 PM2024-01-14T17:37:13+5:302024-01-14T17:37:38+5:30

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात नमो चषकाची धूम सुरू आहे.

BJP is testing public relations of MLAs through Namo Cup | नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी

नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी

नवी मुंबई : सध्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात नमो चषकाची धूम सुरू आहे. यात कोणत्या मतदारसंघात नमो चषकात किती खेळाडूंनी कोणत्या खेळासाठी सहभाग घेतला याची नोंद पक्ष नेतृत्वाकडून घेतली आहे. त्याची आकडेवारीही पक्षाकडून दररोज प्रसूत केली जात आहे. यातून त्या त्या मतदारसंघात विद्यमान आमदार किंवा इच्छुकांचा जनसंपर्क कसा आहे, याची चाचपणी केली जात आहे.

यात राज्यात मराठवाड्यातील गाणगापूर, लातूर आणि परतूर हे तिन्ही मतदारसंघ पहिल्या तीनमध्ये आहेत, तर मुंबईतील मागाठणे, मान खुर्द-शिवाजीनगर आणि चांदीवली सर्वात तळाला आहेत. १२ जानेवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. लोकमतच्या हाती हा चार्ट लागला आहे.
यात गाणगापूर येथे ८२,८०१, लातूर शहरात ७६,७६३ आणि परतूरमध्ये ६२,६८९ खेळाडूंनी नमो चषकात नोंदणी केली आहे. सर्वात तळाशी असलेल्या मागाठणेत १०, मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये १२ आणि चांदीवलीत १४ खेळाडूंची नोंद आहे.

पहिल्या २५ मध्ये मुंबई, ठाण्यात ठणाणा
पहिल्या २५ मध्ये मुंबई, ठाण्यातील एकही मतदारसंघ नाही. मात्र पालघरमधील नालासोपारा चौथ्या आणि विक्रमगड दहाव्या, वसई २४व्या स्थानावर आहे. पनवेल २६व्या स्थानावर आहे.

नवी मुंबईतील बेलापूर पहिल्या १०० मतदारसंघांत
नमो चषकात खेळाडू नोंदणीत राज्यातील पहिल्या १०० मतदारसंघात नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघ ७४व्या स्थानावर आहे. या मतदारसंघात २०१७ खेळाडूंनी नोंद केली आहे, तर ऐरोली मतदारसंघात १०४ खेळाडूंनी नोंद असून, हा मतदारसंघ २३७व्या स्थानावर दिसत आहे.

मतदारसंघ वर येण्यासाठी नोंदणी वाढवा
भाजपाच्या नमो चषक आयोजन समितीकडून दररोज त्या त्या मतदारसंघात नोंदणी होणाऱ्या खेळाडूंच्या आकडेवारीचा चार्ट प्रसूत करण्यात येत आहे. तो पाहून आपण नेमके कोणत्या स्थानावर आहे, हे पाहून खेळाडू नोंदणीत कसे वर येऊ यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पक्षाने केले आहे.

खोटी आकडेवारी देणाऱ्यांचे फुटले बिंग
पक्षाच्या आदेशानुसार प्रत्येक शहरात नमो चषकाची धूम सुरू असून, त्याचा शुभारंभही धडाक्यात करण्यात येत आहे. तो करतांना आयोजकांकडून अमुक इतक्या खेळाडूंनी सहभाग घेतला, हे सांगताना खेळाडूंची संख्या वाढवून सांगण्यात येत आहे. मात्र, पक्षाने प्रसूत केलेल्या आकडेवारीने त्यांचे बिंग फुटले आहे.

नमो चषकातील नोंदणीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या नोंदणीचा मुख्य उद्देश हा आमदारांचा जनसंपर्क किती आहे हा नसून प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा आहे. यातून त्यांना चांगले व्यासपीठ मिळेलच शिवाय राज्य/ राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या क्रीडागुणाना न्याय देता येईल. 
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र

Web Title: BJP is testing public relations of MLAs through Namo Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.