नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बाप बदलणारी औलाद नाही असं म्हणत आव्हाड यांनी नाईक यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का, असा सवाल नाईक यांनी आव्हाड यांना विचारला आहे. मी पक्ष बदलण्याच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय की पक्ष बदलणाऱ्यांची औलाद आमची नाही. म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाप बदलणारी औलाद मी नाही. मात्र माणूस पक्ष एकाएकी बदलत नाही. समाजकारणाला, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमान जतन करता यावा, यासाठी माणूस पक्षांतर करतो, असं नाईक म्हणाले. यानंतर पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या पक्षांतराचा उल्लेख केला. माननीय शरद पवार साहेब पूर्वी काँग्रेसमध्ये होते. युवकपासून मंत्रिमंडळातसुद्धा ते होते. नंतर समाजकारण, राजकारण गतीमान व्हावं यासाठी त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुलोद सरकारचं नेतृत्व केलं आणि कालांतरानं औरंगाबाद मुक्कामी असताना राजीव गांधींच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत पुढे १९९९ साली स्वाभिमानाच्या मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, असं म्हणत नाईक यांनी पवारांच्या पक्षांतराचा उल्लेख केला. पवार साहेबांनीसुद्धा तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग पवारसाहेबांची गणनादेखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का, असा थेट सवाल नाईक यांनी आव्हाडांना विचारला आहे. माणूस गरज म्हणून पक्ष बदलतो. त्यामुळे आव्हाड यांनी अशा प्रकारे खालच्या स्तरावर येऊन भाष्य करू नये, असंही ते पुढे म्हणाले.
'पवार साहेबांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:44 PM
गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जुंपली; नाईक यांचा थेट पवारांवर वार
ठळक मुद्देभाजपा नेते गणेश नाईक यांची शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीकागणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपलीपवारांच्या पक्षांतरावर भाष्य करत नाईक यांचा आव्हाडांना थेट सवाल