n लोकमत न्यूज नेटवर्कभाईंदर : मीरा-भाईंदर भाजपचे स्थानिक नेते असलेले आसिफ शेख यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची पगाराच्या बाबतीत पिळवणूक होत असल्याने त्यांची ठेकेदारांच्या विळख्यातून मुक्तता करा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घातले आहे.
महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना किमान वेतन महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शेख यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून पालिकेची उमेदवारी तसेच स्वीकृत नगरसेवकपदाची उमेदवारीही शेख यांना देण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या उद्यान विभागातील शेख यांच्या भावाच्या कंपनीचा मजूरपुरवठ्याचा ठेकासुद्धा काढून घेण्यात आला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शेख यांनी पुन्हा राष्ट्रवादीतील नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदने दिली होती. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांना भेटून त्यांनी ठेकेदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नाहीnशेख यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पदांवर तांत्रिक व अतांत्रिक कमर्चारी-अधिकारी हे ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. nठेकेदार हे त्यांना किमान वेतनच देत नाहीत. केवळ ६० टक्केच पगार दिला जातो व ४० टक्के पगार अधिकारी व ठेकेदार यांच्या खिशात जातो. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नाहीच, शिवाय त्यांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी आदी अन्य भत्ते व सुविधाही दिल्या जात नाहीत.