भाजप, महाविकास आघाडीला समान कौल, पनवेलमध्ये आकुर्लीत भाजप तर खानावले ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:35 AM2021-01-19T09:35:24+5:302021-01-19T09:38:28+5:30
पनवेल : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले आहेत. भाजप अथवा महाविकास आघाडीत दोन्ही पक्षांनी ग्रामपंचायतीत आमचेच वर्चस्व असल्याचा ...
पनवेल : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले आहेत. भाजप अथवा महाविकास आघाडीत दोन्ही पक्षांनी ग्रामपंचायतीत आमचेच वर्चस्व असल्याचा दावा केला असला तरी पनवेलमध्ये दोन्ही पक्षांना समान कौल दिल्याचे दिसून येत आहे. २४ पैकी २ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. यापैकी आकुर्ली ग्रामपंचायत भाजप तर खानावले ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. उर्वरित २२ ग्रामपंचायतीत दोन्ही पक्षात चुरशीची लढत झालेली पाहावयास मिळत आहे.
पनवेल ग्रामीण भागात शेकापचे वर्चस्व राहिले आहे. मात्र ग्रामीण भागात भाजपचे वर्चस्व वाढत चालले असल्याचे या निकालावरून स्पष्ट दिसत आहे. २४ ग्रामपंचायतीत १३ जागांवर भाजपने दावा केला आहे. तर महाविकास आघाडीदेखील १३ ग्रामपंचायती आम्हाला मिळाल्या असल्याचा दावा करीत आहे. तालुक्यातील सांगुर्ली आणि मोर्बे ग्रामपंचायतीवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. स्थानिक पातळीवर गावविकास आघाड्या स्थापन झाल्याने काही ग्रामपंचायतींवर नेमके कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे हे स्पष्ट होत नाही. शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याने भाजपला काही प्रमाणात रोखण्यास या पक्षांना यश आले आहे. महाविकास आघाडीचे पक्ष वेगवेगळे लढले असते तर भाजपला तालुक्यात फायदा झाला असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. २४ ग्रामपंचायतीमधील २२८ जागांपैकी १४४ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याचे भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख यांनी सांगितले. अनेक वर्षे शिवसेनेचा सदस्य काही ग्रामपंचायतीत नव्हता अशा ठिकाणीदेखील सेनेने खाते खोलले असल्याचा दावा जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला. एका ग्रामपंचायतीवर सेना, ५ ग्रामपंचायतीत सेनेचे सदस्य निवडून आले .
पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायती -
भाजपचा दावा - वाकडी, खानाव, खैरवाडी, उमरोली, वाजे, आकुर्ली, केवाळे, पळीदेवद, वारदोली, पोसरी, सावळे
महविकास आघाडीचा दावा - कोळखे, बारवई, खानावले, नानोशी, साई, पाले बुद्रुक, हरिग्राम, आपटा, उसर्ली खुर्द, देवळोली, वलप
उरणमध्ये पाच ग्रा.पं.वर महाआघाडीचे वर्चस्व -
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतींवर महाआघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, फुंडे, वेश्वी या सहा ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. या सहापैकी केगाव, म्हातवली, चाणजे, नागाव, फुंडे या पाच ग्रामपंचायतींवर महाआघाडीने वर्चस्व मिळविले आहे.
केगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांपैकी ११ जागा महाआघाडीने जिंकल्या आहेत. चाणजे ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी ९ जागी महाआघाडीने विजय प्रस्थापित केला आहे.तर ८ जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
म्हातवलीमध्ये ११ पैकी ६ जागांवर महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.तर ५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. फुंडे ग्रामपंचायतींमध्ये ९ जागांपैकी ६ जागा महाआघाडीने जिंकल्या आहेत.तर ३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. नागाव ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी सहा जागा महाआघाडीने जिंकल्या आहेत. एकमेव वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये भाजपने बाजी मारली आहे.