पनवेल : शहरात निर्माण झालेल्या पाणीसमस्येबाबत पनवेलमधील भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी बुधवारी मंत्र्यांना साकडे घातले. लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनुकळे, तसेच पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या स्वीय सहायकांची भेट घेतली.पनवेल शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यावर आताच उपाययोजना केल्या नाही, तर ही समस्या कायम राहण्याची शक्यता आहे. अमृत योजनेच्या कामाच्या कामाला अद्यापि सुरुवात झाली नाही. या योजनेअंतर्गत शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. या प्रक्रियेला तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शेजारच्या नवी मुंबई महापालिकेकडून दिवसाला २० एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच हेटवणे किंवा कोंढाणे धरणाचा पर्याय द्यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मंत्र्याकडे केली.शिष्टमंडळात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर, नवनिर्वाचित प्रभाग समितीअध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
भाजपा लोकप्रतिनिधींचे मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:03 AM