नवी मुंबई महापालिकेत होणार भाजपा-मनसे युतीचा शुभारंभ?; महाविकास आघाडीचंही ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 10:12 PM2020-01-09T22:12:22+5:302020-01-09T22:15:59+5:30
महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असेल तर भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे.
मुंबई - नवी मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यावर येऊन ठेपली असताना या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेना-५०, राष्ट्रवादी ४० तर काँग्रेस २१ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे एकट्या पडलेल्या भाजपाला नवी मुंबईत मनसेची साथ मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नवी मुंबई महापालिकेत गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं. यातच अनेक नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत गणेश नाईकांच्या गोटात सामील झाले त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे. यातच मनसेदेखील पहिल्यांदाच नवी मुंबईत महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या दोन उमेदवारांना ५० हजारांच्या अधिक मतदान झालं होतं. युती आणि आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणाऱ्या पक्षांच्या विरोधात मनसेने स्वबळावर घेतलेले मतदान याकडे गांभीर्याने पाहायला हवं. मनसेने मागील काही वर्षात नवी मुंबईत विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली छाप पाडली आहे.
महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असेल तर भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतात. सध्यातरी देवेंद्र फडणवीस म्हणत असले की, मनसे आणि भाजपाची विचारसरणी वेगळी आहे. मात्र मनसे आणखी व्यापक भूमिका घेतली तर भविष्यात युतीबाबत विचार होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा-मनसे एकत्र येऊ शकतात. त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहिलं जाऊ शकतं. तूर्तास या सर्व शक्यता असल्याने आगामी काळात मनसेच्या महाधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात यावर मनसेचं भवितव्य अवलंबून आहे.