"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:26 PM2024-10-22T12:26:17+5:302024-10-22T12:26:41+5:30
बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आहे.
Sandeep Naik : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वाशीमध्ये बैठक घेऊन संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आजच संदीप नाईक यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्याआधी संदीप नाईक यांनी पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठवला आहे. दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत संदीप नाईक यांनी पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपने गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्याने नाईक कुटुंबातून दोन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.
भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. पक्ष प्रवेशाआधी संदीप नाईक हे नवी मुंबईमध्ये मेळावा घेणार आहेत. दिलेला शब्द पाळला गेलेला नाही असं संदीप नाईक यांचे म्हणणं आहे. बेलापूर मतदारसंघात कार्यकर्ते नाराज असून त्यांची वेगळी भूमिका असणार असल्याचे संदीप नाईक यांनी म्हटलं आहे.
बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांच्या नावाची शक्यता असताना पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संदीप नाईक हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संदीप नाईक यांनी आज नवी मुंबईत निर्धार मेळावा आयोजित केला आहे. "बेलापूर मतदारसंघातील जनता आणि माझ्यासोबत अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत. पण जाहीरपणे आपली भूमिका काय आहे हे कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. आजचा निर्धार मेळावा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. कार्यकर्ते जे सांगतील तो निर्णय मी घेणार आहे," असं संदीप नाईक म्हणाले.
"कार्यकर्त्यांचा कल ज्या दिशेला जाईल तो निर्णय मी आज घेणार आहे. मागच्या वेळी मला शब्द दिलेला असतानाही तिकीट नाकारल्यानंतर त्यावेळी मी थांबलो. त्यावेळी मी सर्वांचा सन्मान केला. त्यावेळी पूर्ण ताकदीने काम केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे आज कार्यकर्त्यांचे मत असेल तो निर्णय घेईल," असेही संदीप नाईक म्हणाले.