भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:32 AM2024-10-22T06:32:56+5:302024-10-22T06:34:06+5:30
हा वैयक्तिक प्रश्न, निवडणूक लढवण्यापासून रोखणार नाही- गणेश नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी वाशी येथील कार्यक्रमात ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. तर, संदीप नाईक हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना निवडणूक लढवण्यापासून आपण रोखणार नाही, असे भाजपचे नेते तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. परंतु, भाजपने बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची उमेदवारी घोषित करून संदीप नाईक यांची मागणी नाकारली आहे. त्यामुळे नाईक पक्षांतर करणार अशी चर्चा होती. मात्र, ते तुतारी फुंकणार की मशाल पेटविणार, याबाबत मात्र संभ्रम होता.
सोमवारी त्यांनी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. त्यानंतर मंगळवारी वाशी येथील एका कार्यक्रमात ते तुतारी फुंकणार असल्याचा दावा एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने केला. तर, मंगळवारी सकाळी कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली असून, कार्यकर्त्यांच्या मतानुसार अंतिम निर्णय घेईन, असे संदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.