भाजपने चारही आमदारांवर पुन्हा दाखविला विश्वास; पहिल्याच यादीत जाहीर केली नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:11 PM2024-10-21T12:11:56+5:302024-10-21T12:14:06+5:30
भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत ऐरोलीमध्ये गणेश नाईक, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर व उरणमध्ये महेश बालदी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकांची चाहूल लागल्यापासून इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. ऐरोली व बेलापूरमध्ये शिंदेसेनेनेही दावा केला होता. याशिवाय बेलापूरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उमेदवारी मागितली होती. यामुळे पक्ष विद्यमान आमदारांना उमेदवारी देणार की जिल्हा अध्यक्षांना पसंती दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पक्षाने विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
२००९ पूर्वी नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. चारपैकी एकही आमदार पक्षाचा नव्हता. २०१४ च्या निवडणुकीमध्ये बेलापूरमधून मंदा म्हात्रे व उरणमधून प्रशांत ठाकूर विजयी झाले.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार व उरणमध्ये भाजप समर्थक महेश बालदी निवडून आले. सिडको कार्यक्षेत्रामधील या चारही मतदारसंघांमध्ये यावेळेस पुन्हा पक्षाने विद्यमान लोकप्रतिनिधींना तिकीट दिले असून, यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.