भाजपा-शिवसेनेचे 100 अपराध भरले; त्यांचे पानीपत अटळ - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 09:53 PM2019-01-12T21:53:03+5:302019-01-12T21:53:30+5:30
समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानीपत अटळ आहे
नवी मुंबई - समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानीपत अटळ आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा शिवसेनेच्या सरकारवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या आजच्या तिस-या दिवशीची पहिली व एकूण पाचवी सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या अतिशय आक्रमक भाषणात मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढवला.
पाच दिवस उलटूनही बेस्टचा संप सुरूच आहे. प्रवासासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. काय करतेय पालिका, परिवहन खातं? कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील. प्रसंगी रस्त्यावरही उतरेल असा इशारा त्यांनी दिला.
भाजपाच्या सोळा मंत्र्यांचा नव्वद हजार कोटींचा घोटाळा मी पुराव्यानिशी समोर आणला. त्याची चौकशी झाली नाही. माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की चौकशी लावा, जर पुरावे खोटे निघाले तर मला महाराष्ट्राच्या कोणत्याही चौकात फाशी द्या असे आव्हान सरकारला देतांना सामाजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये पैसे खाल्ले, आदीवासी मंत्र्यांनी आदीवासी लोकांसाठीच्या साहित्यात पैसे खाल्ले. अहो या लोकांनी लहान लेकरांच्या चिक्कीतही पैसे मारले. आणि कसला तुमचा पारदर्शी कारभार? असा सवाल केला.
लोकांना रेशनवर धान्य मिळत नाही आणि हे ऑनलाईन घरपोच दारू विकायला निघाले आहेत. जमीन विकून मिळालेला पैसा खिशात राहत नाही, पावडर खाऊन कमावलेली बॉडी कधी टिकत नाही, आणि लाटेत निवडून आलेला आमदार पुन्हा कधी निवडून येत नाही. अशा शब्दात भाजपाच्या लाटेची खिल्ली उडवली.
या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक,विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,जिल्हाध्यक्षा अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार महिला जिल्हाध्यक्षा विदया सुतार आदींसह नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.