नारायण जाधव, नवी मुंबई :नवी मुंबईतीलवीजप्रश्नावर मंगळवारी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने वाशी विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी नवी मुंबईतील वीजप्रश्नावर शहरातील गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे हे दोन्ही आमदार झोपले असल्याची टीका केली होती. म्हात्रे यांच्या या आरोपाला आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नवी मुंबईतील वीजप्रश्न सोडवण्यासाठी मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या कामांची यादी वाचून अनिकेत म्हात्रे हेच झाेपलेले असून, आंदोलन करताना त्यांनी स्टंटबाजी नये, असा इशारा दिला आहे. आमदार म्हात्रे यांनी शहरांतील अनेक प्रश्न सोडविले आहेत. अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र, त्या आपण सांगत नसून फक्त वीज प्रश्न सोडविलेल्या कामांची यादी सांगत आहोत. यात प्रामुख्याने २५ कोटी खर्चून शहरात ६२२ ठिकाणी बसविलेले सोलार वीज दिवे त्यांना दिसले नाहीत का, सीसीटीव्ही दिसले नाहीत का, असा प्रश्न विक्रांत पाटील यांनी विचारला आहे. अनिकेत यांच्या आईवडिलांनी दोघांनीही नवी मुंबईचे उपमहापौरपद उपभोगले आहे. आघाडी सरकारच्या काळात काॅंग्रेसचेच नितीन राऊत ऊर्जामंत्री होते. तेव्हा त्यांनी राऊत यांना जाब का विचारला नाही, असा प्रश्नही पाटील यांनी व्हिडीओ प्रसारित करून अनिकेत म्हात्रेंना केला आहे.