केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपची सत्ता येणार; मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:17 AM2019-06-01T01:17:27+5:302019-06-01T06:11:20+5:30
सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या उत्सवामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. राज्य सरकारने चांगले काम केले आहे.
पनवेल : केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपची सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबई उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी श्री गोवर्धनी संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या उत्सवामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. राज्य सरकारने चांगले काम केले आहे. नवी मुंबईमधीलही अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. जे प्रश्न सुटले नसतील ते पुढील तीन महिन्यांत सोडविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. देशात सत्ता आली असून राज्यातही भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. हा कार्यअहवाल सर्व मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या. रामभाऊ म्हाळगी यांची परंपरा मंदा म्हात्रे या चालवीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनीही काढले. आजपर्यंत सत्ता भोगत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबईचे प्रश्न सोडविले नाहीत.
आपली खासगी प्रॉपर्टी असल्यासारखे ते वागत होते. नवी मुंबईमधील अनेक प्रश्न आमदार मंदा म्हात्रे व सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी माझ्याशी वारंवार पाठपुरावा करून सोडविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार मंदा म्हात्रे यांनीदेखील नवी मुंबईचे प्रश्न सोडविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत, गोवर्धनी संस्थेचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. संस्थेमार्फत आजतागायत भरविण्यात आलेली आरोग्य शिबिरे, सामुदायिक विवाह सोहळे आदीबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली, तसेच नवी मुंबईमधील फ्रीहोल्ड, किल्ले संवर्धन तसेच अनेक कोटींची विकासकामे मुख्यमंत्र्यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नृत्याविष्कार सादर केले. गीतकार संगीत महादेवन यांनीदेखील या वेळी संगीत कार्यक्रम सादर केले.
उपस्थित प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुष्काळग्रस्तांसाठी ११ लाख रु पयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीला या वेळी मंदा म्हात्रे यांनी संस्थेमार्फत दिला. कार्यक्र माला माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, सुरेश हावरे, विजय चौगुले, नवी मुंबई पालिका आयुक्त एन. रामास्वामी, आमदार रमेश पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, पंढरीनाथ पाटील, दीपक पवार, विजय घाटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.