नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. गणेश नाईक यांनी गुरुवारी बोलाविलेल्या बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटले. कोणत्याही परिस्थितीत नरेश म्हस्के यांना मदत करणार नाही, असा पवित्रा घेऊन नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले. ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी लागलीच नरिमन पॉईंट येथील कार्यालयाकडे धाव घेतली आहे.
ठाणे लोकसभेसाठी संजीव नाईक यांना उमेदवारी मिळेल, असे कयास बांधले जात होते. विशेष म्हणजे पक्षानेसुद्धा नाईक यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून संजीव नाईक प्रचाराला लागले होते. मात्र, ऐनवेळी शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्याने नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. गणेश नाईक यांनी महापे येथील क्रिस्टल हाऊसमध्ये बोलाविलेल्या बैठकीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनेला वाट करून दिली.
नाईकांचे राजकारण संपविण्याचा डाव
संजीव नाईक यांना डावलून म्हस्के यांना उमेदवारी म्हणजे, नाईक कुटुंबाचे राजकारण संपविण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला.
३७५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर
गणेश नाईक यांच्यासह भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे आम्ही आमची भूमिका मांडली आहे. त्यानुसार १५ माजी नगरसेवक आणि ३७५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर केल्याची माहिती भाजपच्या वाशी मंडळचे अध्यक्ष विजय वाळूंज यांनी लोकमतला दिली. भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीतील सचिव, महासचिव, उपाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले आहेत.
म्हस्के, प्रताप सरनाईक यांच्यासमोर घोषणाबाजी
कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असतानाच नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक हे गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी महापे येथील क्रिस्टल हाऊसवर दाखल झाले. त्यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. संजीव नाईक यांना उमेदवारी दिली नाही तर सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा दिला. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहून नाईक यांनी या तिघांना अँटी चेंबरमध्ये घेऊन जाण्याचा पर्याय स्वीकारला. त्यानंतरही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती.