प्रदूषण नियंत्रणासाठी प्रचारात भाजपाचा सायकल रथ
By admin | Published: May 8, 2017 06:33 AM2017-05-08T06:33:38+5:302017-05-08T06:33:38+5:30
पनवेल महापालिका जिंकण्याचा संकल्प केलेल्या भारतीय जनता पार्टीने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. पनवेल शहरात भाजपाचा
मयूर तांबडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका जिंकण्याचा संकल्प केलेल्या भारतीय जनता पार्टीने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. पनवेल शहरात भाजपाचा सायकल रथ प्रदूषणरहित प्रचार करीत असून, या आगळ्या-वेगळ्या प्रचारपद्धतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेले प्रचाररथ मध्यंतरीच्या काळात बंद झाले होते. मात्र, निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा रथाला सुरु वात करण्यात आलेली आहे. ‘आपले शहर, आपला अजेंडा’ हा या प्रचाररथाचा विषय असल्याने नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून बदलत्या बहरत्या पनवेलबाबत आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.
निवडणूक प्रचार म्हटले की, बाइकरॅली व त्यातून होणारी वाहतूककोंडी आणि प्रदूषण होते. त्याचबरोबर मोठमोठ्या आवाजात प्रचार करणारी वाहने किंवा प्रचारगीतांच्या फेऱ्या यामुळे होणारे ध्वनिप्रदूषणही वारंवार नागरिकांच्या नापसंतीचा विषय असतो. नागरिकांना वेठीस धरून आपणच या विभागातील किंग आहोत, असे भासवणारे पक्ष व संघटना नागरिकांना आता नको आहेत. नेमके हेच ओळखून भारतीय जनता पक्षाने सायकल प्रचाररथ तयार केले आहेत. कुठलीही वाहतूककोंडी नाही, कसलेही प्रदूषण नाही, घोषणाबाजी तर नाहीच नाही. यामुळे बदलत्या बहरत्या पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत प्रचाराच्या नव्या संकल्पनांचा प्रभावी वापर भाजपाने सुरू केला आहे. एखाद्या पक्षाचे धोरण त्या पक्षाच्या वचननाम्यात दिसत असते. मात्र, नागरिकांनी शहराचा वचननामा बनविण्यासाठी मते कळवावीत, असा पर्याय भाजपाने लोकांपुढे मांडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून बुद्धिवंतांना या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदविता येणार आहे.
असा आहे सायकल रथ
सायकलच्या मागील चाकाशेजारी दोन छोटी चाके बसवून, एक प्रकारची गाडीच वेल्डिंग करून तयार करण्यात आली आहे. फलक लावण्यासाठी मोठी लोखंडी फ्रेम तयार करण्यात आली आहे. त्यावर पनवेल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘आपले शहर, आपला अजेंडा’ अशा प्रकारचे बॅनर तयार केले आहेत. पूर्वी प्रचारासाठी पुरेशी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे बैलगाडी,एखादी दुचाकी अथवा सायकलवर प्रचार केला जात होता. कालांतराने यामध्ये बदल होत गेला. डिजिटल इंडियाचा नवा अवतार भाजपा सरकारने आणला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आज प्रचार होऊ लागला आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रचार करणेही सोपे झाले असले, तरी हटके प्रचार करून मतदारांचे त्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी पुन्हा सायकलवर प्रचार या पारंपरिक पद्धतीचा अवलंब भाजपाने केला आहे.