पनवेलमध्ये भाजपचे सर्वाधिक सरपंच, उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:46 AM2021-02-11T01:46:33+5:302021-02-11T01:46:50+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका : पालीदेवदमध्ये मिळाली १३ मते, शेकापचे मत फुटल्याने खळबळ
पनवेल : जानेवारी महिन्यात विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यात पनवेल तालुक्यात घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात भाजपचे सर्वाधिक सरपंच ,उसरपंच विराजमान झाले आहेत.
पनवेल तालुक्यातील पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटील, उपसरपंचपदी अशोक पाटील निवडून आले. या ग्रामपंचायतीत १२ सदस्य भाजपचे असताना १३ मते त्यांना मिळाली. त्यामुळे शेकापचे एक मत फुटून तो भाजपला मिळाला. त्यामुळे शेकापच्या गोटात मोठी खळबळ माजली. वाजे, खैरवाडी, केवाळे, उमरोली, आकुर्ली, सावळे, वारदोली ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजली भालेकर, उपसरपंचपदी रेवण पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयश्री दिसले, उपसरपंचपदी बाळाराम पाटील, आकुर्ली सरपंचपदी भारती पाटील, उपसरपंचपदी सत्यवान धरणेकर, उमरोली सरपंचपदी कमला मढवी, उपसरपंचपदी रोशन पोपेटा, वारदोली सरपंचपदी संगीता भूतांबरा, उपसरपंचपदी सविता पाटील, केवाळे सरपंचपदी रेणुका गायकर, उपसरपंचपदी कांचन पालकर, वाकडी सरपंचपदी कुंदा पवार, उपसरपंचपदी अरुण पाटील, खैरवाडी सरपंचपदी रजनी ढुमणे, उपसरपंचपदी हनुमान खैर, सावळे सरपंचपदी प्रशांत माळी, उपसरपंचपदी कांता कांबळे, देवळोली सरपंचपदी काजल पाटील, पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भावना जोशी, तर उपसरपंचपदी सतीश पाटील विराजमान झाले आहेत. या सर्व विजयी सरपंच, उपसरपंच शिलेदारांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी अभिनंदन केले. भाजपने सर्वाधिक जागांवर दावा केला असला तरी महाविकास आघाडीच्या वतीने किती ग्रामपंचायतींवर विराजमान झाले आहेत ही माहिती स्पष्ट झालेली नाही. तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी दिली. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.
उरणमध्ये चार ग्रामपंचायतींमध्ये महाआघाडीचे सरपंच आघाडीवर
उरण : उरण तालुक्यातील बुधवारी झालेल्या चारही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत महाआघाडीने बाजी मारली आहे.
तालुक्यातील सहापैकी चार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. केगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदकुमार पाटील तर उपसरपंचपदी चिंतामण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाआघाडीच्या रंजना पाटील यांची तर उपसरपंचपदी पल्लवी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यात सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगेश थळी तर उपसरपंचपदी अशोक कोळी यांची निवड झाली आहे. एकमेव फुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत महाआघाडीचे सागर घरत ७ विरुद्ध २ मतांनी निवडून आले आहेत, तर उपसरपंचपदी चंद्रकांत म्हात्रे यांची निवड झाली आहे.
नागाव आणि वेश्वी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जाहीर झालेल्या चुकीच्या आरक्षणावर याआधीच आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती उरण तहसील कार्यालयातून देण्यात आली.
शेकाप, सेनेची भाजपशी हातमिळवणी
म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक करणारे सेना- भाजप चाणजे ग्रामपंचायतीमध्ये तर शेकाप-भाजप म्हातवली ग्रामपंचायतीत एकत्र आले आहेत. त्यामुळेच या दोन्ही ग्रामपंचायतीची उपसरपंचपदे भाजपला मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.
यांची झाली बिनविरोध निवड
केगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदकुमार पाटील तर उपसरपंचपदी चिंतामण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाआघाडीच्या रंजना पाटील यांची तर उपसरपंचपदी पल्लवी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.