निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:21 AM2020-02-16T02:21:58+5:302020-02-16T02:22:14+5:30

दहा हजार पदाधिकारी उपस्थित राहणार । पहिल्यांदाच राज्य अधिवेशन नवी मुंबईत

BJP's performance today in the wake of the elections | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे शक्तिप्रदर्शन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे शक्तिप्रदर्शन

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप रविवारी शक्तिप्रदर्शन करणार आहे. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन केले असून, त्याला जवळपास दहा हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला असून, या अधिवेशनामुळे पक्षाला लागणारी गळती थांबणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गळती सुरू झाली आहे. पक्षाचे पाच नगरसेवक शिवसेनेत व तीन राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. पक्षाला गळती सुरू झाली असतानाच भाजपने दोन दिवसांचे राज्य अधिवेशन नवी मुंबईमध्ये ठेवले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी नेरुळमधील तेरणा महाविद्यालयामध्ये राज्यातील सर्व खासदार, आमदार, महपौर, जिल्हा अध्यक्ष यांची बैठक आयोजित केली होती. रविवारी सायन-पनवेल महामार्गावर नेरुळमध्ये खुले अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनास राज्यभरातील नगरपालिकांपासून खासदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, आघाड्यांचे संयोजक असे जवळपास दहा हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण नवी मुंबईमध्ये भाजपचे ध्वज व होर्डिंग लावण्यात आले आहेत. महामार्गासह पामबीच रोडवरील दुभाजकांमध्येही पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. पक्षाची राज्यव्यापी भूमिका या अधिवेशनामध्ये स्पष्ट केली जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भाजपला कधीच अपेक्षित यश मिळाले नव्हते. २००५ च्या निवडणुकीमध्ये एक नगरसेवक, २०१० च्या निवडणुकीमध्ये एक नगरसेविका व २०१५च्या निवडणुकीमध्ये सहा नगरसेवक, ही भाजपची पालिकेमधील ताकद होती; परंतु विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक यांनी ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महापालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप थेट सत्ताधारी बनला. या वेळी निवडणुकीमध्ये पालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याची रणनीती भाजप नेत्यांनी आखली आहे; परंतु शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने येथेही महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेऊन भाजपला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू लागले आहेत.शक्तिप्रदर्शनामुळे गळती थांबणार का? याकडे लक्ष लागले आहे.

विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती नवीन अध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मंत्री विनोद तावडे यांनी अधिवेशनाच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली.

अधिवेशनातील भूमिकेकडे लक्ष
भाजपचे राज्य अधिवेशन प्रथमच नवी मुंबईमध्ये होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणार असल्याचे पक्षाचे दोन्ही आमदार, जिल्हा अध्यक्ष व इतर पदाधिकारीही अधिवेशन यशस्वी करण्यासाठी एका महिन्यापासून परिश्रम करत आहेत.

Web Title: BJP's performance today in the wake of the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.